: महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दीड महिन्याच्या बाळांना रक्तवाढीसाठी दिलेल्या औषधाची मुदत संपल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार करताच आरोग्य विभागाने या औषधांच्या बाटल्या परत घेतल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. () याबाबत अधिक माहिती अशी की, संजयनगर परिसरातील अंगणवाडीतून लहान मुलांसाठी रक्तवाढीचे औषध दिले जाते. लहान मुलांना डोस देण्यासाठी आलेल्या काही पालकांना शुक्रवारी रक्तवाढीच्या औषधाच्या बाटल्या देण्यात आल्या. काही मुलांना ही औषधे दिल्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर औषधांची मुदत संपण्याचा प्रकार उघडकीस आला. औषधाची मुदत नोव्हेंबरपर्यंत होती. मुदत संपणाऱ्या औषधाचे वाटप २८ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. हा प्रकार गंभीर असून, याबाबत काही पालकांनी आरोग्य विभागाकडे तक्रार केल्या आहेत. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागात मुदत संपलेल्या औषधांचा मोठा साठा असण्याची शक्यता आहे. याची चौकशी होण्याची गरज आहे. याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता, नोव्हेंबरची मुदत असलेल्या तीन बाटल्यांचे वाटप करण्यात आल्याचं कबुल करण्यात आलं. या तीनही बाटल्या परत घेतल्या आहेत. आरोग्य सेविकांनी मुलांच्या घरी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली असून सर्व मुलांची प्रकृती उत्तम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3pmROvn
No comments:
Post a Comment