कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर विसावा पॉईंटवरुन कार अंदाजे ३०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात चालक जागीच ठार झाला आहे. संजय गणेश जोशी (वय ६० या.राजारामपूरी पाचवी गल्ली,कोल्हापूर) असं ठार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला असून साखरपा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली. () विसावा पॉइंटवर उभारलेले लोखंडी ग्रील दोन वर्षापासून दुरवस्थेत आहे. ते मजबूत असते तर दुर्घटना टळली असती अशी चर्चा परिसरात सुरू होती. आंबा घाटात विसावा या प्रेक्षणीय पॉईंटवर रस्ता सोडून कार ३०० फूट खोल दरीत कोसळली. यावेळी चालक जोशी कारमधून बाहेर फेकले गेले. कारपासून ४० फूट अंतरावर त्यांचा मृतदेह पडला होता. दुपारी बारा वाजता साखरपा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आंबा व साखरपा येथील मदत पथकातील सदस्य झाडा झुडपाच्या आधार घेत दरीत उतरले. तब्बल चार तासानंतर मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. दरम्यान, मदतकार्य पथकातील राहुल गायकवाड, राजू काकडे, आंबा येथील दिनेश कांबळे, दिग्विजय गुरव, सुनील काळे, राहुल बोंडे, अक्षय महाडिक, राजेश गायकवाड यांनी मृतदेह वर काढण्यास योगदान दिले. पाच वाजता मृतदेह साखरपा रूग्णालयात शवविच्छेदनास नेला. देवरूखचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव, पी.एस.आय. विद्या पाटील या घटनेप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/34KxPAi
No comments:
Post a Comment