जोहान्सबर्ग : भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर हे शांत स्वभावाचे आहेत, पण आज ते भारताच्या एका खेळाडूवर चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. भारतीय संघाकडून खेळताना तुमची काही जबाबदारी आहे की नाही, असेदेखील त्यांनी या खेळाडूला सुनावले. नेमकं घडलं तरी काय, पाहा...भारतीय संघासाठी सामन्याचा तिसरा दिवस महत्वाचा होता. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी मोक्याच्या क्षणी अनुभव पणाला लावत दमदार फलंदाजी केली आणि आपली अर्धशतकेही झळकावली. त्याचबरोबर तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीही रचली. यावेळी त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचा चांगला सामना केला. काहीवेळा उसळत्या चेंडूंचे वार अंगावर झेलले आणि भारताला सुस्थितीत नेले. अजिंक्यने ५८, तर पुजाराने ५३ धावा केल्या आणि भारताच्या अन्य फलंदाजांसाठी चांगले व्यासपीठ तयार केले. पण रिषभ मात्र बेजबाबदारपणे यावेळी खेळल्याचे पाहायला मिळाले. पहिले दोन चेंडू त्याला चांगल्या पद्धतीने खेळता आले नाहीत, पण तरीही तो तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्यासाठी गेला आणि त्याने आपली विकेट दक्षिण आफ्रिकेच्या संघाला बहाल केली. त्यावेळी गावस्कर समालोचन करत असताना पंचवर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. गावस्कर म्हणाले की, " पंतने जो फटका मारला त्याचे कोणतेही कारण देता येऊ शकत नाही. काही जणं हा त्याचा नैसर्गीक खेळ असल्याचे म्हणत असतील तर तो मुर्खपणा ठरेल. कारण भारतीय संघाकडून खेळताना तुम्ही काही जबाबदारी घ्यावीच लागते. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी मैदानात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचे वार झेलले, तर पंतनेही त्याच जबाबदारीने खेळायला हवं." भारताला पंतच्या विकेटने मोठा धक्का बसला. कारण त्यावेळी पंत आणि हनुमा विहारी ही शेवटची फलंदजांची जोडी मैदानात होती. हनुमा विहारी अखेरपर्यंत बाद झाला नाही आणि त्याने नाबाद ४० धावांची खेळी साकारली. जर पंतने ही चुक केली नसती आणि त्याने विहारीला चांगली साथ दिली असती तर भारताला मोठी धावसंख्या रचता आली असती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3t0Kx7X
No comments:
Post a Comment