अहमदनगर : वीज बिलाच्या वसुलीसाठी ग्रामीण भागात डीपी बंदची कारवाई केल्यानंतर वीज वितरण कंपनीने शहरी ग्राहकांचे वीज बिल वसुलीसाठी वीज मीटर काढून नेण्याची कारवाई सुरू केली आहे. याला शिवसेनेने आक्षेप घेतला असून या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. वीज कंपनीने आपला कारभार सुधारावा आणि ही जाचक वसुली बंद करावी अन्यथा वीज कंपनीच्या कार्यालयाचीच वीज तोडून अधिकाऱ्यांना आत कोंडले जाईल, असा इशारा शिवसेनेनं दिला आहे. () शिवसेनेचे माजी नगरसेवक विक्रम अनिलभैय्या राठोड यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना यासंबंधी निवेदन देऊन हा इशारा देण्यात आला आहे. शिवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, शहर जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव, नगरसेवक मदन आढाव, दत्ता जाधव, अमोल येवले यावेळी उपस्थित होते. निवेदनात म्हटलं आहे की, करोनाच्या संकटामुळे उद्योगधंदे बंद पडून हजारो कुटुंब बेरोजगार झाली आहेत. अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीने लोकांना सरासरी वीज बिलाच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा बिले पाठवली आहेत. त्याची वसुली पठाणी पद्धतीने करण्यात येत आहे. वीज बिल न भरल्यास किंवा ऑनलाईन भरलं असलं तरी त्यांची नोंद वीज वितरण कंपनीकडे होण्यास विलंब लागत असला तरी त्यासाठी न थांबता कर्मचारी वीज मीटर काढून ग्राहकांना संकटात टाकत आहे. महावितरणने अशाप्रकारे वसुली थांबवावी. माणुसकीच्या नात्याने ग्राहकांना वागणूक द्यावी, अन्यथा शिवसैनिक आपला हिसका दाखवतील. येत्या सोमवारी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय शॉर्ट सर्कीटमुळे चितळेरोडवरील बेकरीला लागलेली आग, काही दिवसांपूर्वी टीव्हीच्या केबलमध्ये वीज प्रवाह उतरून युवकाचा झालेला मृत्यू, जाहिरात फलक लावताना कमानीत उतरलेल्या वीज प्रवाहामुळे तरुणाचा झालेला मृत्यू, जिल्हा रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागाला लागलेली आग, जिल्हा रुग्णालयाच्या एक्स्प्रेस फीडरमधून खाजगी रुग्णालयाला केलेला वीज पुरवठा या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात यावी. ज्यांचं नुकसान झालं, त्यांना भरपाई देण्यात यावी. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3qg2Sfp
No comments:
Post a Comment