केप टाऊन : रिषभ पंत हा कधी सुधारणार, असा प्रश्न भारतीय संघाला नक्कीच पडला असेल. कारण दुसऱ्या सामन्यात पंतकडून दोन मोठ्या चुका झाल्या होत्या आणि त्यामुळे भारताचा पराभव झाला होता. आता तिसऱ्या सामन्यातही पंतककडून एक मोठी चूक झाल्याचे पाहायला मिळाले आणि याचा चांगलाच फटका भारतीय संघाला बसला. नेमकं घडलं तरी काय, पाहा... ही गोष्ट घडली ती ५०व्या षटकात. हे षटक भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर टाकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ही गोष्ट घडली. शार्दुलच्या गोलंदाजीचा सामना यावेळी दक्षिण आफ्रिकेचा टेम्बा बवुमा करत होता. शार्दुलचा हा चेंडू बवुमाला समजला नाही. या चेंडूवर तो फटका मारायला गेला आणि चेंडूने बॅटची कडा घेतली. हा चेंडू पहिल्या स्लीपमधील चेतेश्वर पुजारा आता पकडणार, असे दिसत होते. त्यामुळे आता भारताला अजून एक विकेट मिळणार, अशी आशा निर्माण झाली होती. पुजारा यावेळी हा झेल पकडायला गेला खरा, पण पंतने चेंडूच्या मार्गात उडी मारली आणि पुजाराची एकाग्रता भंग केली. दुसरीकडे हा झेल पंतला पकडता आला नाहीच, पण त्याने पुजाराच्या मार्गातही अडथळा निर्माण केला आणि झेल सुटला. हा झेल सुटल्यावर भारताचे नुकसान झालेच, पण त्याचबरोबर संघाला अजून एक मोठा फटका बसला. हा झेल सुटला आणि चेंडू मैदानात ठेवलेल्या भारतीय संघांच्या हेल्मेटला लागला. त्यामुळे पाच धावांचा दंड यावेळी भारतीय संघाला झाला आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाला या पाच धावा देण्यात आल्या. दुसऱ्या कसोटी सामन्यात पंतने कीगान पीटरसनचा सोपा झेल सोडला होता.त्यानंतर पीटरसनने अर्धशतक झळकावले होते आणि त्याचा भारताला मोठा फटका बसला होता. त्याचबरोबर या कसोटीच्या दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी दमदार अर्धशतके झळकावत शतकी भागीदारी केली होती. पण यावेळी पंतने चुकीचा फटका मारत आपली विकेट दक्षिण आफ्रिकेला आंदण दिली. पंतला यावेळी भोपळाही फोडता आला नव्हता. त्यानंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी पंतवर जोरदार टीका केली होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3GnLcEq
No comments:
Post a Comment