: 'शिर्डी मतदारसंघातील माता भगिनींना सुरक्षित राहण्यासाठी कोणत्याही किराणा दुकानात मद्य विक्री करू देणार नाही. किराणा दुकानात मद्य विक्री सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध करणार,' असा निर्धार नगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे. संसदेत सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात या विषयावरून खडाजंगी झाली होती. विखे-पवार यांच्यातील राजकीय वैर यानिमित्ताने थेट संसदेत आणि पुढील पिढीतही पोहचल्याचे दिसून आले. एवढ्यावरच न थांबता डॉ. विखे यांनी राज्य सरकारच्या निर्णयाला मतदारसंघात थेट विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. () लोणी (ता. राहाता) येथील श्री वरद विनायक सेवाधामच्या स्वागत कमानीचे उद्घाटन डॉ. विखे पाटील यांचे हस्ते झाले. यावेळी सेवाधामचे संस्थापक महंत उद्धव महाराज मंडलिक (नेवासेकर), भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील, विश्वनाथ महाराज मंडलिक, ट्रक सोसायटीचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, बाळासाहेब आहेर उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. विखे बोलत होते. ते म्हणाले , संसदेत मी गोरगरीब व सामान्य जनतेच्या आशीर्वादाने पोहोचलो आहे. गोरगरिबांची बाजू संसदेत मांडण्याचे कर्तव्य मी सातत्याने करत राहणार असून माझ्या या भूमिकेमुळे कोणाला काही त्रास होत असेल तर त्याची मी काळजी करणार नाही. किराणा दुकानात मद्य विक्री करण्याचा राज्य सरकारचा हा निर्णय अतिशय दुर्दैवी असून या निर्णयाला माझा ठाम विरोध असून कोणीही आडवे आले तरी त्याची तमा न बाळगता चुकीची प्रथा पडू देणार नाही. या चुकीच्या निर्णयाला नियंत्रणात आणण्यासाठी जनतेने देखील आज संकल्प केला पाहिजे. जर किराणा दुकानात कोणी मद्य विक्री करताना आढळून आल्यास त्या दुकानदाराचे दुकान सील करून त्याला मोठा विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. उद्धव महाराज मंडलिक म्हणाले, मतदार संघात किराणा दुकानात मद्य विक्री होऊ देणार नसल्याच्या खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत आहे. माता भगिनींच्या कल्याणासाठी व चुकीच्या प्रथेला पायबंद घालण्यासाठी त्यांच्या या निर्णयाच्या पाठीशी सर्व वारकरी संप्रदाय ठामपणे उभे राहणार असल्याचं अभिवचन देतो, असं ते म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/JC9QytD
No comments:
Post a Comment