वर्धा : राज्यात खळबळ माजवणाऱ्या येथील जळीत कांड प्रकरणाचा निकाल 9 फेब्रुवारीला लागणार आहे. या प्रकरणात पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कार्यालयीन कामकाजच्या केवळ 19 दिवसातच 426 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयातही या प्रकरणात एकूण 64 सुनावणी घेत 29 साक्षदरांचे प्रत्यक्ष जबाब नोंदविण्यात आले आहे. घटनेला दोन वर्षे झाली असून अंकिताच्या मृत्यूला 10 फेब्रुवारी रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. 9 फेब्रुवारीला निकाल लागणार असल्याचे सांगण्यात आल्याने अंकिताच्या मृत्यूला 2 वर्षे पूर्ण होताना हा निकाल लागणार असल्याचे दिसते. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मृत अंकिता हिंगणघाटच्या स्व. आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. यामध्ये पीडिता 3 फेब्रुवारीला 2020 ला सकाळी तिच्या गावाहून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जाताना आरोपी विकेश नगराळे दबा धरुन बसला होता. अंकिता दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतील पेट्रोल काढलेली पेट्रोल तिच्यावर ओतले आणि तिला पेटवून टाकले. यात गंभीररीत्या जळालेल्या अवस्थेत नागपूरातील ऑरेंजसिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु झाले. मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फेब्रुवारीला तिने अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणात महिला तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाजाच्या १९ दिवसांत दोषारोप पत्र पूर्ण केले. शिवाय शुक्रवार २८ फेब्रुवारी 2020ला या प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल ४२६ पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने पीडितेची बाजू मांडण्याकरिता विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती केली. प्रकरणाची पहिली सुनावणी 4 मार्च 2020 रोजी हिंगणघाट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायलयात झाली. आतापर्यंत न्यायालयाने 64 सुनावणी घेतली आहे. 64 तारखांपैकी 34 तारखेला न्यायलयात ऍड. उज्वल निकम सरकारी पक्षातर्फे न्यायालयात हजर होते. तर अॅड. दीपक वैद्य हे प्रत्येक सुनावणीत सरकारतर्फे उपस्थित होते. या प्रकरणात पोलिसांकडे एकूण 77 साक्षदार होते त्यापैकी 29 साक्षदारांची साक्ष न्यायलयात नोंदविण्यात आलीय. या प्रकरणात घटनास्थळी असलेल्या साक्षीदाराने न्यायलयात सरकारची बाजू भक्कमपणे मांडल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. आता न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/0ulBK9h
No comments:
Post a Comment