Breaking

Saturday, February 26, 2022

मटा संवाद विशेष लेखः पत्र ते मोबाइल https://ift.tt/uO8N7yz

किरण येले पत्र, एक आत्मिक संवाद. तो काळजातून, रक्तातून बोटात उतरतो आणि तिथून शाई बनून कागदावर. पूर्वी हा संवाद शाई आणि कागदावर पसरून घरी यायचा; एखादा निरोप पक्षी यावा तसा. तो संवाद आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत, त्याला अनेक अनोळखी हातांचा स्पर्श झालेला असायचा. त्या पत्रात काय असेल याची उत्सुकता जशी आपल्याला असायची, तशी त्या पत्र पोहोचवणाऱ्यालाही असायची. लेखक, कवी, साहित्यिकांसाठी तर अशी म्हणजे एक शाबासकी असायची. त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीवर वाचक प्रगल्भतेने भाष्य करायचा, मतमतांतरे व्यक्त करायचा आणि तो संवाद मग एखादे फूल डायरीत जपून ठेवावे, तसा जपला जायचा. असे अनेक पत्रासंवाद पुढे वाचनीय ग्रंथ म्हणून वाचकांना लाभले. छत्रपती शिवरायांनी लिहिलेली पत्रे, जीएंची पत्रे, अब्राहम लिंकनचे पत्र, व्हॅन गॉगचा भाऊ थोरोची पत्रे, रेनर मारिया रिल्केची पत्रे आजही अभ्यासली जातात. पुढे मोबाइलचा काळ आला आणि पत्रांतून होणारा कागदावरचा संवाद स्क्रीनवर होऊ लागला. वाचक, लेखक आणि सगळेच हातातल्या मोबइलवर आपल्या मनातले शब्द पाठवू लागले. यामुळे काही चांगल्या गोष्टी हरवल्या, तर काही सापडल्या. वाचकाने पाठवलेल्या पत्रात काय असेल, याची ते फोडण्याआधीची हुरहूर हरवली. आता कधीही, कुठेही आपण मोबाइलवर आलेला वाचकाचा संदेश सवयीने सहज उघडून वाचू लागलो. त्याला तातडीने उत्तरही देऊ लागलो; पण यामुळे एखाद्याला पत्र लिहिण्यापूर्वी त्या विषयावर होणारे वैचारिक मंथन आणि मानसिक आंदोलने हरवली. हस्ते-परहस्ते पत्र आल्यानंतर होणारा आनंदही हरवला. पत्रातून येणारे त्या व्यक्तीचे हस्ताक्षर हरवलेच; पण मायन्यातील 'सप्रेम नमस्कार' आणि शेवटी 'आपला स्नेहांकित' हे शब्द हरवले. ते शब्द होते, तोपर्यंत ते शब्द फक्त पत्राचार वाटत होते. आज ते हरवल्यावर, त्या शब्दांमागची असोशी हरवली. वाचकाचे ते पत्र टेबलवर अनेक दिवस दिसत असे. ते पाहून त्या व्यक्तीची येणारी आठवणही हरवली. आता मोबाइलमधल्या ५० मेसेजमध्ये कुठे तरी कुणाचे संदेश असतात. त्यात तो वाचकाचा आत्मीय संदेश हरवून जातो. काही दिवस राहतो आणि मग डिलिट होतो. लेखकाला येणारी बहुतांशी पत्रे दीर्घ असतात. कथा, कविता वाचताना आपल्या मनात नेमकी काय आंदोलने झाली, याचे वाचकाने केलेले सविस्तर वर्णनही असायचे. त्याच्या खासगी आठवणी असायच्या; सुख-दुःखेही असायची. अशा जिव्हाळ्याच्या पत्रांमुळे वाचक आणि लेखकात आपसूकच वेगळे बंध जुळत जायचे. आता मोबाइलमध्ये टाइप करण्याच्या नीरस आणि तांत्रिक बाबीमुळे सारे संदेश छोटे झाले. काय आवडले, नावडले हे कळविण्यापुरते बहुतांशी संदेश सीमित झाले. नंतरचा संवाद फोनवर होऊ लागला आणि पुढे कलाकृतीबद्दलच्या वाचकांच्या मताचे दस्तावेजीकरण थांबले. मोबाइलवरील संदेशामुळे एक छान गोष्ट घडली; ती म्हणजे लेखक, कवी वाचकाला कधीही उपलब्ध झाले. त्यांच्याशी बोलण्यासाठी वा त्याला पत्र लिहिण्यास संकोचणारा अगदी तळागाळातला वाचक किंवा दूर कुठे तरी गावखेड्यात राहणारा वाचक थेट संदेश पाठवू लागला. पुस्तक वाचल्यावर जे वाटले, ते लगेच कळवू लागला. 'बाईच्या कविता' वाचून अनेक तळागाळातल्या स्त्रियांनी त्यांची दुखणी विश्वासाने मोबाइलच्या संदेशांतून कळवली. 'मोराची बायको' वाचून महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींनी त्यांचे विचार पाठवले. या सगळ्यांनी पत्रे निश्चितच पाठवली नसती; कारण मनात साचलेले कागदावर उतरवणे सगळ्यांनाच जमत नाही. अनेकांना तसे लिहिण्यास संकोच वाटतो. हा संकोचाचा अडसर मोबाइलमुळे दूर झाला. दूर कुठे तरी पश्चिम महाराष्ट्रातल्या पेट्रोलपंपावर काम करणारा वाचकही संदेश पाठवू लागला. या संदेशामुळे उभारी मिळाली. जीर्ण पत्रांना येणारा तो वास आणि आजीच्या हातासारखा स्पर्श मात्र हरवला. कधी अभ्यासपूर्ण आणि कधी मायेने संवाद साधणारा दीर्घ संवाद हरवला. वाचकांसाठी लेखक कसा दिसतो, कसा बोलतो, कसा वागतो ही हुरहूर संपली आणि वाचकावर आपली कथा, कविता नेमकी काय परिणाम करते, याचा विचाराअंती दिलेला लेखी अभिप्राय हरवला. मोबाइलमध्ये आलेले संदेश काही काळात डिलिट होत जातात; तसेच मोबाइलने जोडलेली बहुतांशी वाचक-लेखक नातीही काही वेळा विरळ होत डिलिट होत जातात. मनातूनही ती माणसे विसरली जातात. पत्र अभिप्रायातून जुळलेले वाचक मात्र पत्र दिसताच पुन्हा पुन्हा आठवत राहतात. एक मात्र खरे, पत्र पाठवणारे असो, की मोबाइलवर संदेश पाठवणारे, प्रेम करणारा एक एक वाचक म्हणजे एक एक चालताबोलता पुरस्कारच असतो.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/TXvjFzL

No comments:

Post a Comment