मुंबई : ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्त्या ईडीच्या रडारवर आल्या आहेत. १७ वर्षांच्या संशयित व्यवहारांवरुन मेधा पाटकर यांच्यावर ईडीची वक्रदृष्टी पडली आहे. ईडीसोबत महसूल गुप्तचर संचलनालय आणि आयकर विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं बोललं जात आहे. पण मेधा पाटकर यांनी मात्र या वृ्त्ताचं खंडन केलं आहे. असा कोणताही गुन्हा माझ्या नावे दाखल झाला नाही. अफवा पसरविण्याचं हे काम सुरु आहे. यापाठीमागे राजकीय खेळी आहे, असा गंभीर आरोप मेधा पाटकर यांनी केला आहे. 'नर्मदा नवनिर्माण अभियान नावाची' एक एनजीओ होती. या एनजीओच्या खात्यावर काही पैशांचा व्यवहार झाला होता. तो व्यवहार संशयित असल्याचा ईडीचा दावा आहे. तसंच या ईडीच्या हाताला याच व्यवहारातील काही पुरावे देखील मिळाले आहेत. त्याच आधारावर ईडीने मेधा पाटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची चर्चा आहे. पण या चर्चेतली हवा मेधा पाटकर यांनी काढून घेतली आहे. मेधा पाटकर काय म्हणाल्या? ईडीने माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल केला नाहीय. या फक्त अफवा आहेत. अफवा पसरविण्यामागे राजकीय खेळी आहे. ज्या व्यक्तीने आमच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे, त्याला कोणताही कागदोपत्री पुरावा देता आलेला नाहीय, असंही मेधा पाटकर यांनी स्पष्ट केलं. १७ वर्षांच्या संशयित व्यवहारांवरुन मेधा पाटकर यांच्यावर ईडीची वक्रदृष्टी २००५ साली हा व्यवहार झाला होता. या घटनेला आता १७ वर्ष उलटून गेली आहेत. १७ वर्षानंतर आता संशयित व्यवहारांवरुन मेधा पाटकर यांच्या पाठीमागे ईडीचं शुक्लकाष्ठ लागू शकतं. ईडीने यासंदर्भातील तपासही सुरु केला आहे. कदाचित एनजीओला समन्स पाठवू शकते. तसंच मेधा पाटकर यांनाही ईडी समन्स धाडू शकते, अशीही शक्यता आहे. पैशांचा व्यवहार काय होता, कुठून पैसे आले, किती पैसे आले? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे आणि ईडी मेधा पाटकर यांना विचारु शकते. ईडीच्या हाताला लागलेल्या पुराव्यांवरुन आता ईडीने तपास सुरु केलेला असून येत्या काही दिवसांत यासंदर्भातील पुढील कार्यवाही होईल, असं सांगितलं जात आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/vnltQmY
No comments:
Post a Comment