Breaking

Thursday, May 5, 2022

एसटीच्या बडतर्फ कर्मचाऱ्यांसह एकूण ८९,९१८ कर्मचारी कामावर हजर, पण... https://ift.tt/5ZAxaLB

म. टा. प्रतिनिधी, राज्यात प्रवाशांकडून गाड्यांची मागणी वाढत असताना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरत आहे. एसटीच्या बडतर्फ कर्मचाऱ्यांसह एकूण ८९,९१८ कर्मचारी कामावर परतले असताना गाड्यांअभावी सुमारे ४० टक्के कर्मचारी बसून आहेत. ग्रामीण भागापेक्षा मेट्रो शहरांकडे महामंडळाचा कल अधिक असल्याने एसटीचे प्रवासी भारमान ४० टक्क्यांपर्यंत खालावले आहे. वाहतूक विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका प्रवाशांना बसत असून एसटी सेवा सुरू झाल्यानंतरही गरिबांना अनधिकृत प्रवासी वाहनातूनच असुरक्षित प्रवास करावा लागत असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. २७ ऑक्टोबर २०२१ ला संप सुरू झाला, त्यावेळी ९२,२६६ कर्मचारी महामंडळाच्या हजेरी पटावर होते. सहा महिन्यांच्या संपात १४९ कर्मचाऱ्यांचे निधन आणि एक हजार कर्मचारी सेवानिवृत्त झाले होते. २२ एप्रिल २०२२ला हजेरीपटावर ९१,११७ कर्मचारी आहेत. यापैकी पाच मेपर्यंत ८९,८१८ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत तर १,२९९ कर्मचारी विविध कारणास्तव गैरहजर आहेत. बहुतांश कर्मचारी कामावर हजर झाले असले तरी गाड्यांअभावी या कर्मचाऱ्यांना कामे कशी सोपवणार, असा प्रश्न एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे आहे. मोठ्या शहरांना जोडणाऱ्या रेल्वे तसेच उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या पूर्णपणे भरून जात असताना महामंडळाच्या प्रवासी गाड्यांचे भारमान ४० टक्क्यांपर्यंत खालावले आहे. एप्रिल-मे २०१९ मध्ये १८ हजार गाड्या प्रवासी सेवेत असताना महामंडळाचे भारमान ६०-६२ टक्के इतके होते. एसटी गाड्या कमी असताना भारमान वाढणे अपेक्षित असताना त्यात २० टक्क्यांची घट झाल्याची वस्तुस्थिती आहे, अशी माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. लांब पल्ल्याच्या मार्गावर लक्ष राज्यात सुमारे साडेबारा हजार एसटी गाड्या प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत. उर्वरित गाड्या प्रवासी वाहतुकीसाठी योग्य नाहीत. शाळांना लागलेली उन्हाळी सुट्टीमुळे शहरातील अनेक नागरिक सहकुटुंब गावी निघाले आहेत. या सोबतच ग्रामीण भागात जत्रा-यात्रांचा जोर आहे. आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. वाहतूक विभागाकडून केवळ मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर या लांबपल्ल्याच्या मार्गावर लक्ष केंद्रित केल्याने ग्रामीण भागात एसटीचा तुटवडा निर्माण झाला आहे. एसटी फेऱ्यांचे नियोजन, ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देणे आणि भारमान वाढवण्यासाठी आज, शुक्रवारी महामंडळातील सर्व विभाग नियंत्रकाची बैठक बोलावण्यात आलेली आहे. संपात झालेले नुकसान भरून काढणे आणि प्रवाशांना दर्जेदार सेवा कशी देता येईल, यावर चर्चा करून बैठकीअंती निर्णय घेण्यात येईल. - अनिल परब, परिवहन मंत्री आणि अध्यक्ष एसटी महामंडळ


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/7AEQ43k

No comments:

Post a Comment