Breaking

Sunday, May 1, 2022

तेच मैदान, तोच प्रसंग, शेवटही तसाच! बाळासाहेबांच्या सभेवेळीही अजान झाली अन्... https://ift.tt/AthvDw0

औरंगाबाद: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेली मनसेप्रमुख राज ठाकरे यांची औरंगाबादमधील सभा अखेर पार पडली आहे. या सभेत घडलेल्या एका प्रसंगाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर राज ठाकरे () यांची सभा झाली. राज ठाकरे यांचे भाषण अंतिम टप्प्यात असताना ते मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात टीका करत होते. त्यावेळी मैदानात अचानक कसलातरी आवाज ऐकू आला. हा आवाज मशिदीतील अजानचा असल्याची चर्चा आहे. त्यानंतर राज ठाकरे प्रचंड संतापले. जर सभेत हे भोंगा सुरू करत असतील तर माझी पोलिसांना विनंती आहे, त्यांच्या तोंडात आताच बोळा कोंबा, जर सरळ सरळ मार्गाने समजत नसेल तर यानंतर महाराष्ट्रात काय घडेल, हे मला माहिती नाही. जे पोलीस अधिकारी आहे, त्यांना सांगतो, ते आताच बंद करा. माझं एक म्हणणं आहे, जर ते ऐकतच नसतील तर एकदा काय ते होऊनच जाऊ द्या,असे राज ठाकरे यांनी म्हटले. या प्रसंगानंतर राज ठाकरे चांगलेच वैतागले होते. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत राज ठाकरे यांनी आपले भाषण आटोपते घेतले. मैदानात आलेला तो आवाज नक्की कशाचा होता, याचे गूढ अद्यापही उकललेले नाही. मात्र, असाच एक प्रसंग भूतकाळात घडला होता. २००५ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचीही मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा झाली होती. तत्पूर्वी २००४ मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली होती. त्यानंतर औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी आघाडीने चांगलाच जोर लावला होता. त्यामुळे औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता टिकणार की नाही, असा पेच निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची सभा घेण्यात आली होती. योगायोगाची गोष्ट म्हणजे राज ठाकरेंची सभा झाली त्याच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेबांची सभा होती. बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐन रंगात आले असताना त्यावेळीही अचानक अजान सुरु झाली होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी पॉझ घेतला. त्यानंतर आपल्या खास शैलीत एक हात कमरेवर आणि दुसऱ्या हाताचं बोट हवेत आकाशाच्या दिशेने उंचावत ते म्हणाले की, याचसाठी मी विचारतोय, तुम्हाला औरंगाबाद हवंय की संभाजीनगर? बाळासाहेब ठाकरे यांच्या या वाक्यानंतर मैदानात टाळ्यांचा कडकडाट झाला होता. विशेष म्हणजे या सभेमुळे औरंगाबाद महानगरपालिकेत सलग चौथ्यांदा शिवसेना आणि भाजपची सत्ता आली. त्यामुळे आज राज ठाकरे यांच्या सभेत घडलेल्या प्रसंगानंतर सगळ्यांना बाळासाहेबांचीच आठवण आली. राज ठाकरे यांनीही मैदानात आवाज ऐकल्यानंतर सडकून टीका केली. जर ते ऐकतच नसतील तर एकदा काय ते होऊनच जाऊ द्या,असे वाक्य राज ठाकरे यांनी उच्चारताच मनसैनिकांना स्फुरण चढले. त्यामुळे राज ठाकरे यांनी आज जाणीवपूर्वक बाळासाहेबांची कॉपी करण्याचा प्रयत्न केला का, अशी चर्चाही प्रसारमाध्यमांमध्ये रंगली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lJkYKQm

No comments:

Post a Comment