Breaking

Friday, May 6, 2022

अ‍ॅक्सिस फंडात मोठा घोटाळा? चर्चेने शेअर बाजारात खळबळ https://ift.tt/bxO19zK

वृत्तसंस्था, नवी दिल्ली/मुंबई एका खासगी बँकेशी संबंधित म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा झाला आहे, असे वृत्त शुक्रवारी सकाळपासूनच आर्थिक जगतात पसरले आणि सर्वत्र दाणादाण उडाली. हा फंड अॅक्सिस म्युच्युअल फंड असल्याचे व त्यात कथित एक हजार कोटींचा गैरव्यवहार केला गेल्याचे भांडवल बाजारातील तज्ज्ञ, दलाल एकमेकांना सांगू लागले. बाजारातील ही कुजबूज सर्वतोमुखी झाल्याने याचा थेट परिणाम होऊन शेअर बाजार आपटले. दरम्यान, 'अॅक्सिस'ने मागील दोन महिन्यांपासून आर्थिक अनियमिततांबाबत स्वतःहून चौकशी सुरू केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, अॅक्सिस म्युच्युअल फंडाने फंड व्यवस्थापकांच्या जबाबदाऱ्यांमध्ये चार मेपासून बदल करण्यात सुरुवात केली आहे. या अंतर्गत वरील कथित गैरव्यवहार करणारे वीरेश जोशी व दीपक अगरवाल या फंड व्यवस्थापकांचा समावेश यांत करण्यात आलेला नाही. ट्विटरवरील प्रतिक्रियांनुसार, या दोघांना अॅक्सिस म्युच्युअल फंडाने नारळ दिल्याचे वृत्त आहे. यापैकी वीरेश जोशी हे फंड व्यवस्थापक असून, दीपक अगरवाल हे फंड व्यवस्थापक व इक्विटी रिसर्च अॅनालिस्ट आहेत. कसा झाला गैरव्यवहार? वीरेश जोशी व दीपक अगरवाल या फंड व्यवस्थापकांनी कथित फ्रन्ट रनिंग व्यवहाराचा आधार घेऊन कोट्यवधी रुपयांची माया जमवल्याचा संशय आहे. एखाद्या कंपनीच्या समभागाची वाटचाल कशी होणार आहे, याची गोपनीय माहिती हाती येऊन तिचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून त्या समभागाचे 'ट्रेडिंग' संबंधित व्यक्तीकडून केले जाते. याला 'फ्रंट रनिंग' असे म्हणतात. तसाच प्रकार अॅक्सिस फंडात या दोघांकडून केला गेला असावा, असा संशय आहे. भांडवल बाजार नियंत्रक सेबीनुसार, फ्रंट रनिंग हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे व याविरोधात कडक कारवाई करण्याासठी सेबीने नियमांत वेळोवेळी बदलही केले आहेत. 'सेबी'चे या प्रकरणावर गेल्या दोन वर्षांपासून लक्ष आहे. प्राथमिक तपासात 'अॅक्सिस'मधील प्रकार हा 'फ्रंट रनिंग'च असून, एकूण नऊ कंपन्यांच्या समभागांच्या व्यवहारांतून सुमारे १७० कोटी रुपये कमावले गेल्याचे स्पष्ट झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी वृत्तसंस्थांना सांगितले आहे. फंडाकडून स्वतःहून तपास सुरू अॅक्सिस एएमसी मागील दोन महिन्यांपासून (फेब्रुवारीपासून) या सर्व प्रकाराची चौकशी करीत आहे. यासाठी अॅक्सिस एएमसीने मान्यताप्राप्त बाह्य सल्लागारांची मदत घेतली आहे. या सर्व तपासाचा एक भाग म्हणून दोन फंड व्यवस्थापकांना निलंबित करण्यात आले आहे. नियम व नियमांची चौकट पाळण्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे. कोणत्याही नियमांचे उल्लंघन किंवा या नियमांची पूर्तता न केली जाणे हे फंड कदापि सहन करणार नाही. तेव्हा बाजारगप्पांवर विश्वास ठेवू नये, असे अॅक्सिस फंडाकडून सांगण्यात आले आहे. निर्देशांक कोसळले मुंबई : जागतिक भांडवल बाजारांची दाणादाण उडाल्याचा थेट परिणाम म्हणून, अॅक्सिस म्युच्युअल फंडात कथित मोठा गैरव्यवहार झाल्याचे वृत्त पसरल्याने आणि जागतिक स्तरावरील भूराजकीय अशांततेमुळे शुक्रवारी दोन्ही निर्देशांक कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८६६.६५ अंकांनी कोसळत ५४,८३५.५८ यावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २७१.४० अंकांची घसरण नोंदवत १६,४११.२५ वर बंद झाला. सविस्तर वृत्त...८


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/qkKR18C

No comments:

Post a Comment