सोलापूर : नियमांना फाटा देऊन शेततळ्याला कुंपण न करणं ही बाब तीन चिमुकल्यांच्या जीवावर बेतली आहे. मोहोळ तालुक्यातील शेटफळ इथं खेळत-खेळत शेततळ्याकडे गेलेल्या तीन चिमुकल्यांचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. ही घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडलेली असताना खबर देण्यास विलंब करण्यात आल्याने रात्री दहा वाजता मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मृत कार्तिकचे वडील मुकेश ज्योतिनाथ हिंगमीरे यांनी मोहोळ पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे भाऊजी भरत निकम हे मोलमजुरीची कामे करण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील माचनूरहुन शेटफळ ता. मोहोळ येथे आले होते. सोमवारीही ते नेहमीप्रमाणे कामावर गेले असता एकत्र खेळणारे विनायक भरत निकम वय-१२, सिद्धार्थ भरत निकम वय-१०, दोघे रा. माचणूर, तर कार्तिक मुकेश हिंगमिरे रा. शेटफळ वय-६ हे तिघेजण नजीकच्या शेततळ्याल्या पोहायला गेले. पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेनंतर सर्वांनी शेततळ्यावर धाव घेतली पण तोपर्यंत उशीर झाला होता. हे शेततळे महेश तानाजी डोंगरे या शेतकऱ्याचे असून त्यांनी या शेततळ्याला नियमानुसार तारेचे कुंपन घातलेले नाही. मृत बालकांचे पालक हे भटक्या नाथपंथी डवरी समाजातील आहेत. शेततळ्याला कुंपण नसल्याची बाब उघड होऊ नये, दबाव होता, म्हणून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यास विलंब केला जात होता. शेवटी माध्यमांच्या दबावानंतर मोहोळ पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेचा तपास पोलीस हवालदार आदलिंगे हे करीत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/9t7uVfT
No comments:
Post a Comment