मुंबई : मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा'ला जय महाराष्ट्र करुन 'पुन:श्च मातोश्री' म्हणत शिवसैनिकांच्या भक्कम आधारावर आणि कुटुंबाच्या साथीने 'वर्षा ते मातोश्री' असा ९ किलो मीटरचा पल्ला जवळपास २ तासांनी पार केला. यादरम्यान शिवसैनिकांचं अफाट प्रेम, महिला कार्यकर्त्यांच्या त्यांच्याप्रती असलेल्या सहृदयी भावना याचं दर्शन ठाकरे कुटुंबाला झालं. पण या साऱ्या शक्तीप्रदर्शनाने तसंच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा सोडण्याच्या निर्णयाने राष्ट्रवादीचे वरिष्ठ मंत्री नाराज झाले असल्याची माहिती समोर येतीये. रात्री ९ वाजता उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा सोडण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. यांनी भावनिक आवाहन करुनही बंडखोर नेते एकनाथ शिंदे माघारी फिरायला तयार नाहीत. हे पाहून मुख्यमंत्र्यांनी शासकिय निवासस्थान 'वर्षा' बंगला सोडण्याचा निर्णय घेतला. यांनी वर्षा बंगला सोडतावेळी हजारो शिवसैनिक बंगल्याबाहेर जमले होते. यावेळी कट्टर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या गगनभेदी घोषणा देऊन शिवसैनिक पक्षनेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचं दाखवून दिलं. यावेळी सगळेच कार्यकर्ते कमालीचे भावूक झाले होते. शेकडो शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंवर फुलांचा वर्षाव केला. मुख्यमंत्रीही शिवसैनिकांचं प्रेम पाहून गलबलून गेले, त्यांच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. त्यांनी शिवसैनिकांचं अभिवादन स्वीकारत गर्दीतून वाट काढली अन् गाडीत बसून मातोश्रीच्या दिशेने निघून गेले. अजित पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीला मंत्री जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. या सर्व नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. चर्चेत मुख्यमंत्र्यांनी वर्षा सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयावर या सगळ्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच एकनाथ शिंदे यांच्या बंडापाठीमागे सेनेतील कुणीतरी आणखी एक नेता आहे, असा संशय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीत व्यक्त केला. तशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. उद्धव ठाकरे रात्री साडे नऊच्या आसपास वर्षा बंगल्याच्या बाहेर पडले. त्यांच्या सन्मानासाठी बंगल्याबाहेर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, दीपाली सय्यद यांच्यासह अनेक सेना पदाधिकारी होते. सगळ्यांनी आपल्या हातात असलेल्या फुलांचा वर्षाव मुख्यमंत्र्यांवर केला. शेकडो शिवसैनिकांनी गगनभेदी घोषणा दिल्या. उद्धव ठाकरे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है... कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला..... अशा घोषणांनी वर्षा बंगल्याचा परिसर दुमदुमून गेला. शिवसैनिकांचं प्रेम पाहून उद्धव ठाकरेंना देखील गलबलून आलं. त्यांनी दोन्ही हात जोडून शिवसैनिकांचं अभिवादन स्वीकारलं. गर्दीतून वाट काढली अन् गाडीत बसून 'मातोश्री'च्या दिशेने निघून गेले. पण वर्षा ते मातोश्रीदरम्यान ठिकठिकाणी शिवसैनिक मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला थांबले होते. मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांचं अभिवादन स्वीकारत, कधी गाडीतून तर कधी गाडीबाहेर येऊन शिवसैनिकांना लढण्याची उर्मी दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/P1SYxjt
No comments:
Post a Comment