लिस्टर : भारतीय गोलंदाजांनी चारदिवसीय क्रिकेट सराव सामन्यात अचूक मारा करून लिस्टरशायर संघाला २४४ धावांत रोखण्यात यश मिळवले. मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या, तर शार्दूल ठाकूर आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केले. लिस्टरशायर संघाकडून खेळत असलेला चेतेश्वर पुजारा शुक्रवारी शून्यावरच बाद झाला, तर ऋषभ पंतने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवसअखेर भारताने दुसऱ्या डावात १ बाद ८० धावा केल्या. पहिल्या डावात भारताला नाममात्र दोन धावांची आघाडी घेत आली. पण तरीही त्यांच्यावर तिसऱ्या दिवशी दडपण कायम असेल. कारण भारताचा दुसरा डाव गडगडला तर त्यांच्यावर पराभवाची नामुष्की येऊ शकते. एका स्थानिक संघाकडून खेळत असताना भारतीय संघाविरुद्ध खेळताना भारतीय संघावर नामुष्कीची वेळ येऊ शकते, तर इंग्लंडविरुद्ध खेळताना त्यांची काय अवस्था होईल, अशी चर्चा सध्या क्रिकेट विश्वात सुरु आहे. भारताचा पहिला डाव गडगडला होता, तसेच जर दुसऱ्या डावात घडले तर काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. भारतीय संघाने पहिला डाव ८ बाद २४६ धावांवरच घोषित केला. मोहम्मद शमीने सुरुवातीपासूनच अचूक मारा केला. त्याने आपल्या सलगच्या षटकात कर्णधार सॅम इव्हन्स आणि पुजाराला बाद केले. त्याने पुजाराचा शून्यावरच त्रिफळा उडविला. पंतने आपल्या नेहमीच्या शैलीने फलंदाजी केली. त्याने ८७ चेंडूंत चौदा चौकार व एका षटकारासह ७६ धावा केल्या. भारताकडून केवळ उमेश यादवला विकेट मिळाली नाही. दुसऱ्या डावात श्रीकर भरतने पुन्हा एकदा छाप पाडली. तो ५९ चेंडूंत ३१ धावांवर खेळत आहे. स्कोअरबोर्ड ः भारत ८ बाद २४६ (घोषित) आणि १८ षटकांत १ बाद ८० (श्रीकर भारत खेळत आहे ३१, शुभमन गिल ३८) वि. लिस्टरशायर २४४ (ऋषभ पंत ७६, रिषी पटेल ३४, मोहम्मद शमी १२-३-४२-३, रवींद्र जडेजा ८-३-२८-३, शार्दूल ठाकूर १०-२-७१-२, मोहम्मद सिराज ११-२-४६-२)
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LMF65S8
No comments:
Post a Comment