नवी दिल्ली : वर्ल्ड कप नेमबाजीसारखी महत्वाची स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली होती. पण तरीही महाराष्ट्राचा स्वप्नील कुसळे हा पूर्णपणे फिट नव्हता. पण स्वप्नीलने स्वत:ला या स्पर्धेत झोकून दिले आणि देशाला रौप्यपदक जिंकवून दिले. कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेतील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात रौप्यपदक जिंकले. स्वप्नीलला गुरुवारी झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या सेर्ही कुलिश याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली. स्वप्नीलचे हे वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिलेच पदक आहे. बाकू (अझरबैझान) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत स्वप्नीलला प्राथमिक फेरीत दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. आठ खेळाडूंचा सहभाग असलेल्या अंतिम फेरीत आघाडी सतत बदलत होती. युक्रेनच्या कुलिशने या टप्प्यात स्वप्नीलला ४११-४०९.१ असे मागे टाकले. अंतिम फेरीत २६ वर्षीय स्वप्नीलला १०-१६ अशा पराभवास सामोरे जावे लागले. कुलिशने अखेरच्या पाचपैकी चार प्रयत्नांत दहापेक्षा जास्त गुण नोंदवले, तर स्वप्नीलला दोन प्रयत्नांत नऊ गुणच साधता आले. त्यामुळे लढतीचा निर्णय झाला. भारताचे स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. भारताने दहा मीटर एअर रायफलच्या महिला सांघिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आता स्वप्नीलच्या रौप्यपदकामुळे भारताची दोन पदके झाली आहेत. भारत पदक क्रमवारीत आता सातवा आहे. अव्वल क्रमांकावरील कोरियाने तीन सुवर्ण आणि एका ब्राँझसह चार पदके जिंकली आहेत. ‘ही तर केवळ सुरुवात’मुंबई ः ‘वर्ल्ड कप स्पर्धेतील हे माझे पहिले वैयक्तिक पदक आहे. ही केवळ सुरुवात आहे. अंतिम लक्ष्य खूप दूर आहे. मात्र, काही महिन्यापूर्वी तंदुरुस्त नसताना त्यानंतर जिंकलेले हे रौप्यपदक माझी वाटचाल योग्य दिशेने असल्याचे दर्शवते,’ असे स्वप्नीलने सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील कळंबवाडी गावचा स्वप्नील हा मध्य रेल्वेत नोकरीला आहे. ‘अंतिम फेरीच्या पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी झाली. अर्थातच अंतिम फेरीचे सुरुवातीस दडपण नक्कीच होते. त्यामुळे बुधवारी रात्री नीट झोपही लागली नाही. मात्र, एकदा नेमबाजी सुरू झाल्यावर पूर्णपणे खेळावर लक्ष केंद्रित झाले. काहीसे चढउतार आले; पण ते अपेक्षितच असतात. सुवर्णपदकाच्या लढतीत नक्कीच चांगली कामगिरी अपेक्षित होती. अर्थात वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचा विश्वास या पदकाने नक्कीच दिला आहे,’ असे स्वप्नील म्हणाला. जानेवारीत तब्येत ठीक नसल्याने आणि दुखापत असल्याने सराव चांगला झाला नव्हता. त्या वेळी शरीर पूर्ण साथ देत नसल्याने सरावात योग्य लक्ष्यवेध साधला जात नव्हता. त्याचा एकंदरीत कामगिरीवरही परिणाम झाला होता. त्यानंतर पुन्हा प्रगती सुरू केली. वर्ल्ड कपमधील पदकाचा वेध हे त्यामुळेच साध्य झाले आहे, असेही स्वप्नीलने सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/qTzfktJ
No comments:
Post a Comment