Breaking

Saturday, June 25, 2022

Ranji Trophy Final : मुंबईला विजयासाठी अखेरची संधी, फक्त ९८ षटकांचा खेळ शिल्लक https://ift.tt/w1k2ZMb

बेंगळुरू : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मुंबई या मोसमात जिंकणार नाही, अशीच चिन्हे दिसत आहेत. मध्य प्रदेशने मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यात शनिवारी चौथ्या दिवसअखेर आपली पकड जास्तच मजबूत केली आहे; पण त्यानंतर मध्य प्रदेश संघातील कोणाच्याही चेहऱ्यावर हास्य दिसत नाही. खडूस मुंबईकर खेळाडूचा चिवट प्रतिकार धोकादायक ठरू शकेल, असेच त्यांना वाटत आहे. क्रिकेटमधील अनिश्चिततेवर, चमत्कारावर, कधीही हार न मानण्याच्या जिगरबाज वृत्तीवरच मुंबईची मदार आहे. या सामन्यातील जास्तीत जास्त ९८ षटकांचा खेळ शिल्लक आहे. आठ विकेट शिल्लक असताना मुंबईची पिछाडी अजूनही ४९ धावांची आहे. या परिस्थितीत पिछाडी भरून काढून मध्य प्रदेशला आव्हानात्मक लक्ष्य देण्याचे आणि प्रतिस्पर्ध्यांच्या दहा विकेट घेण्याचे आव्हान मुंबईसमोर आहे. त्यातच पाऊस आणि अपुऱ्या प्रकाशामुळे अखेरच्या दिवशी पूर्ण षटकांचा खेळ होण्याची शक्यता कमी असेल, याचेही दडपण मुंबईवर असेल. दुसऱ्या डावात बाजी उलटवण्याचे आव्हान मुंबईनेच आपल्यासाठी अवघड केले. शम्स मुलानीच्या पाच विकेट आणि त्याला तनुष कोटियन आणि तुषार देशपांडेची लाभलेली माफक साथ सोडल्यास मुंबई गोलंदाज पूर्ण दडपण आणण्यात अपयशी ठरले. रजत पाटीदार आणि मध्य प्रदेशच्या तळाच्या फलंदाजांनी मुंबईला सतावले. त्यामुळे मुंबईला पहिल्या डावात १६२ धावांनी पिछाडीवर जावे लागले. मध्य प्रदेशच्या पहिल्या डावातील सर्वाधिक आकर्षक फलंदाजी केलेल्या रजत पाटीदारने मुंबईला १७७.२ षटके क्षेत्ररक्षण करण्यास भाग पाडले. तिसऱ्या दिवसअखेर जीवदान लाभलेल्या पाटीदारच्या फलंदाजीवर ढगाळ वातावरणाचा कोणताही परिणाम झाला नाही. त्याने सहज धावा घेताना दर्दी रसिकांना खूश केले. तो खराब चेंडूंची प्रतीक्षा करीत होता आणि ते त्याला मिळतही होते. पाटीदारच्या साथीदारांवर मुंबईने जास्त लक्ष्य केंद्रीत केले. कर्णधार आदित्य श्रीवास्तव मोहित अवस्थीच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर चकला. तुषार देशपांडेने अक्षत रघुवंशीच्या यष्टी उखडल्या. पार्थ साहनीला पृथ्वी सावने जीवदान दिले; मात्र तो जास्त सतावणार नाही, याची काळजी शम्स मुलानीने घेतली. या वेळी मुंबई केवळ ५६ धावांनी मागे होते. मात्र, रजतला सारांश जैनची साथ लाभली. सारांशने संधी मिळाल्यावर हल्ला केला. त्याने मुंबईच्या जखमेवर मीठ चोळणारी अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे मध्य प्रदेशच्या अखेरच्या चार विकेटनी १०६ धावांची भर घातली. पहिल्या डावातील पिछाडी भरून काढण्यासाठी मुंबईने आक्रमक सुरुवात केली. पृथ्वी आणि हार्दिक तामोरेने सुरुवातीपासून हल्ला सुरू केला. पृथ्वीने ‘लाँगऑन’ला उंच षटकार खेचला. मुंबईने धावगतीस चांगलाच वेग दिला. मुंबईला रोखण्यासाठी मध्य प्रदेशने बचावात्मक पवित्रा घेतला. फिरकी गोलंदाजांनी डाव्या यष्टीबाहेर तर मध्यमगती गोलंदाजांनी उडव्या यष्टीबाहेर मारा सुरू केला. मुंबईकरांनी त्यामुळे आडव्या बॅटचा वापर सुरू केला. रविवारच्या पाचव्या दिवसाचा खेळ ही केवळ औपचारीकता असावी, हा मध्य प्रदेशचा प्रयत्न असेल, तर उपाहारानंतर किमान अर्धा तासपर्यंत फलंदाजी करताना आव्हानात्मक धावसंख्या करण्याचे मुंबईचे लक्ष्य असेल; मात्र त्याहीपेक्षा मध्य प्रदेशचा दुसरा डाव संपण्याचे आव्हान जास्त अवघड असेल. मुंबई ४२ वे विजेतपद जिंकण्यापेक्षा मध्य प्रदेश पहिले विजेतेपद जिंकण्याची शक्यता जास्त आहे. स्कोअरबोर्ड ः मुंबई ३७४ आणि २२ षटकांत २ बाद ११३ (पृथ्वी साव ४४ - ५२ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकार, हार्दिक तामोरे २५ - ३२ चेंडूंत २ चौकार आणि १ षटकार, अरमान जाफर खेळत आहे ३० - ३४ चेंडूंत ३ चौकार, सुवेद पारकर खेळत आहे ९, कुमार कार्तिकेय १०-१-५०-१, गौरव यादव ५-०-२३-१) वि. मध्य प्रदेश १७७.२ षटकांत सर्व बाद ५३६ (यश दुबे १३३, शिवम शर्मा ११६, रजत पाटीदार १२२ - २१९ चेंडूंत २० चौकार, आदित्य श्रीवास्तव २५, सारांश जैन ५७ - ९७ चेंडूंत ७ चौकार, धवल कुलकर्णी २४-४-५३-०, तुषार देशपांडे ३६-१०-११६-३, शम्स मुलाणी ६३.२-११-१७३-५, मोहित अवस्थी ३२-७-९३-२, तनुष कोटियन २२-१-९०-०)


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/zKWol3P

No comments:

Post a Comment