मुंबई : २०१९ साली शिवसेना - भाजपने एकत्र निवडणूक लढवल्या होत्या. राज्यातील जनतेने या युतीलाच कौल दिला होता. सेना भाजप एकत्र सत्ता स्थापन करावी अशीच लोकांची भावना होती. मात्र, त्यानंतरही आपण असंगाशी संग करत काँग्रेस राष्ट्रवादीशी घरोबा केला. लोकभावनेला पायदळी तुडवत असताना तेव्हा आपल्याला लाज वाटली नव्हती का, असा ‘शालजोडीतला’ सवाल शिवसेनेचे प्रतोद भरतशेठ गोगावले यांनी विचारला आहे. आम्ही बाळासाहेबांचा हिंदूत्ववादी विचार लोकभावनेचा आदर करत सेना भाजप युतीचे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे आम्हाला ना त्याची लाज बाळगण्याची गरज आहे ना राजीनामा देण्याची असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. दहिसर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांमध्ये भाषण करताना शिवसेनेतील आमदारांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावर गोगावले यांनी हे उत्तर दिले आहे. यापूर्वी झालेल्या चूका टाळून आता तरी असंगाशी संग सोडा असे आवाहनही भरतशेठ गोगावले यांनी केले आहे. आम्हाला आव्हान देऊ नये शिवसेनाप्रमुखांच्या तालमीत तयार झालेल्या आम्हा मावळ्यांची हिम्मत काय आहे हे उभ्या जगाने पाहिले आहे. तुम्हालाही त्याची अनुभूती आली असेलच. बाळासाहेबांच्या धगधगत्या विचारांची ही हिम्मत आहे. त्यामुळे कुणी आम्हाला आव्हान देऊ नये. त्याचे चटके अनेकांना सहन होणार नाही , असा अप्रत्यक्ष इशाराही गोगावले यांनी दिला आहे. शिवसेनेचे काही आमदार आजही या युतीच्या बाहेर आहेत. त्यांनी आता जनाची नाही तर मनाची लाज बाळगत काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाखविलेल्या हिंदूत्वाची पुन्हा एकदा कास धरावी असे आवाहनही त्यांनी केले. सुबह का भूला शाम को घर लौटा तो उसे भूला नही केहेते असेही गोगावले यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/z8JLsWV
No comments:
Post a Comment