अमरावती : लग्न ठरलेल्या एका वधूचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्ह्यातील एका १९ वर्षीय तरुणीचे ६ जुलैला लग्न ठरलेले होते. मात्र, ही वधू ५ जुलैच्या सायंकाळपासून बेपत्ता झाली होती. यानंतर मंगळवारी तिचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर माझ्या मुलीची हत्या झाली आहे, असा आरोप मृत तरुणीचे वडील संजय नेवारे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी शिरजगाव कसबा पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे. संजय सदाशिव नेवारे हे शिरजगाव कसबामध्ये गोवारीपुरा भागात राहतात. त्यांना एक मुलगी व मुलगा आहे. त्यांची मुलगी साक्षीचे (वय १९) ६ जुलैला लग्न ठरले होते. ५ जुलैला सायंकाळी ४ ते ५च्या दरम्यान ती घराबाहेर गेली. तिचा मोबाइल घरीच होता. त्यामुळे ती कुठे बाहेर गेली असेल, असा कुटुंबीयांचा समज झाला. मात्र, त्यानंतर ती परत आलीच नाही. त्याच दिवसापासून ती दिसून न आल्यामुळे संजय नेवारे यांनी शिरजगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. नातेवाइकांनीही तिचा शोध घेतला. १२ जुलैला गोवारीपुराच्या मागील बाजूस असलेल्या नारायण पोटे यांच्या शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. यानंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी ठाणेदार प्रशांत गिते यांना माहिती दिली असता, पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला. तर यावेळी मुलीच्या अंगावर अर्धवट कपडे असल्याचं आढळले. याप्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/nw5r6eo
No comments:
Post a Comment