वर्धा : राज्यात सर्वदूर पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी ढगफूटी सदृश्य पाऊस होत आहे. तर बऱ्याच ठिकाणी रस्ते वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटत आहे. यातच, समुद्रपूर तालुक्याच्या वडगाव, सावंगी, सायगव्हाण व लोखंडी या चार गावांना जोडणारा पोथरा नदीवरील पुलाचा सिमेंटचा रस्ता वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पहिल्याच मुसळधार पावसामुळे पुलाची दुरावस्था झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पुलावरील रस्ता वाहून गेल्यानं चार गावांचा संपर्क तुटला आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्याचे नदी नाले दुभडी भरून वाहत आहे. अनेक गावांमध्ये पूर आला आहे. समुद्रपूर तालुक्यातही पावसाने चांगलाच हाहाकार माजावलाय. समुद्रपूर तालुक्याच्या वडगाव पिंपळगाव मार्गांवरील पोथरा नदीच्या पात्राला जोडणाऱ्या पुलावरील सिमेंट काँक्रीटचा रस्ता वाहून गेल्यानं विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी हाच मार्ग असल्यानं या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी, नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, वर्धा जिल्ह्यात शनिवारी पावसाने चांगलाच कहर केला. मुसळधार आलेल्या पावसामुळे नदी - नाल्यांना पूर आला आहे तर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे आर्वी तालुक्यातील बाकळी नदीला पूर आला आहे. नदीला आलेल्या पुरामुळे आर्वी कौढण्यपूर राज्यमार्ग बंद झाला असून यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Cv1gVJK
No comments:
Post a Comment