मुंबई : राज्याचा प्रशासकीय कामांचा गाडा ज्या मंत्रालयाच्या इमारतीतून हाकला जातो तिथे नागरिकांना प्रवेश करताना पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. काम झाले नाही, वा न होणारे काम प्रशासनाने करावे या हट्टापोटी अनेक जण पाण्याच्या बाटल्यांमधून कीटकनाशक वा रॉकेल घेऊन येतात व ते प्राशन करण्याचा वा अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा आत्महत्यांच्या प्रयत्नांना रोखण्यासाठी गृह विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मंत्रालयातील प्रवेशद्वाराजवळ सध्या पिण्याच्या पाण्याचा बाटल्यांचा खच पडल्याचे दिसून येत आहे. मंत्रालयात सर्व सामान्य नागरिकांना आकाशवाणी समोरच्या प्रवेशद्वाराजवळूनच प्रवेश देण्यात येत आहे. हा प्रवेश देताना पोलिसांकडून सर्वांची कसून तपासणी करण्यात येत आहे. संबंधित नागरिकांकडे आवश्यक ते ओळखपत्र आणि गेट पास असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. त्याचवेळी पोलिसांकडून सध्या पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन जाण्यास मनाई केली जात आहे. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत मंत्रालयात प्रवेश करताना सामान्य नागरिकांच्या खिशात तंबाखू व गुटख्याच्या पुड्या आहेत का याचाही शोध घेतला जात होता. आता पाण्याच्या बाटलांचाही शोध पोलिसांनी सुरू केला असून पाण्याच्या बाटल्या असल्यास प्रवेशद्वाराजवळ काढून ठेवल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्रालयात येऊन विषप्राशन करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून गृह विभागाने पाण्याच्या बाटल्यांवर बंदी घातली आहे. मंत्रालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये याविरोधात तीव्र नाराजी उमटत आहे. आत्महत्या रोखण्यासाठी इतरही उपाय - मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबरोबरच इतर प्रवेशद्वाराजवळ पाण्याची पिंपे भरून ठेवली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिस प्रशासनाची ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून पोलिसांनी पिण्याच्या पाण्याची पिंपे भरून ठेवली आहेत. - मंत्रालयातील पाचव्या-सहाव्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे मंत्रालयात पहिल्या मजल्यावर मजबूत जाळ्या लावण्यात आल्या आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/UreSOHN
No comments:
Post a Comment