पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपमधील संबंधात गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला असल्याचं दिसून येत आहे. बिहारच्या राजकारणातील घडामोडी पाहता येत्या दोन दिवसांमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय मंत्री आर.सीपी. सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. राजद नेते तेजस्वी यादव यांनी गेल्या चार महिन्यांपासून नितीशकुमार यांच्यावर टीका केलेली नाही. तर, दुसरीकडे जदयूनं देखील तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली नाही. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या पक्षाची उद्या बैठक होणार आहे. मंगळवारी राजद आणि जदयूच्या विधिमंडळ पक्षाच्या स्वतंत्र बैठका होत आहेत. त्यामुळं ११ ऑगस्टपूर्वी बिहारमध्ये एनडीएचं सरकार कोसळण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे नितीश कुमार राजद सोबत मिळून नव्यानं सरकार बनवेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नितीश कुमारांनी पाच बैठका, कार्यक्रम टाळले भारताच्या सरन्यायाधीशांनी १ मे रोजी एक बैठक बोलावली होती त्या बैठकीला नितीशकुमार उपस्थित राहिले नव्हते. १७ जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली घरोघरी तिरंगा अभियानासाठी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली होती त्याला देखील नितीश कुमार उपस्थित नव्हते. २२ जुलै रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात देखील नितीशकुमार यांनी निमंत्रण येऊनही जाणं टाळलं होतं. २५ जुलै रोजी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याला नितीशकुमार यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. तरी देखील नितीश कुमार यांनी त्या सोहळ्याला अनुपस्थिती दर्शवली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नितीशकुमार आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव वगळता इतर सर्व मुख्यमंत्री उपस्थित होते. राजद आणि जदयूच्या स्वतंत्र बैठका बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष राजदचे प्रमुख तेजस्वी यादव यांनी विधिमंडळ पक्षाची बैठक मंगळवारी बोलावली आहे. तर, नितीश कुमार यांच्या जदयूनं देखील मंगळवारी बैठक बोलावली आहे. २०१७ मध्ये तुटलेला जदयू आणि राजदचा संसार पुन्हा एकदा सुरु होणार का हे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये स्पषट होईल. आर.सीपी. सिंह आणि चिराग पास्वान नितीश कुमारांच्या नाराजीचं कारण? केंद्रीय मंत्रिमंडळात नितीशकुमार यांना २०१९ मध्ये दोन मंत्रिपदं हवी होती. मात्र, आर.सीपी. सिंह यांनी परस्पर निर्णय घेत एका मंत्रिपदावर समाधान मानलं. याशिवाय त्यांनी मंत्रिपद देखील स्वत:कडे घेतलं. नितीशकुमार यांनी याचा वचपा आर.सीपी. सिंह यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारुन काढला. जदयूनं आर.सीपी. सिंह यांना त्यांच्या संपत्तीविषयी माहिती मागितली होती. मात्र, त्याऐवजी आर.सीपी. सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला. दुसरीकडे चिराग पासवान हे देखील एनडीएच्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळं नितीश कुमार आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचा विचार करता मोठा निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/g2BRYGh
No comments:
Post a Comment