पोर्ट ऑफ स्पेन : ‘खेळाडूंनी वेस्ट इंडिजकडून खेळावे यासाठी मी त्यांच्याकडे भीक मागणार नाही,’ असे स्पष्ट मत वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी व्यक्त केले. वेस्ट इंडिजमधील खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यांऐवजी व्यावसायिक लीगला प्राधान्य देत आहेत. त्याचा विंडीज संघाच्या कामगिरीवर परिणाम होत आहे. वेस्ट इंडिजचे खेळाडू व्यावसायिक लीगला प्राधान्य देत असल्यामुळे टी-२० वर्ल्ड कपसाठी विंडीजला सर्वोत्तम संघाची निवड करता येणार नाही, अशी चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना सिमन्स म्हणाले, ‘खेळाडू वर्ल्ड कपही खेळण्यासाठी तयार होत नसल्याच्या यातना होतात; पण करणार काय. त्यांनी आंतरराष्ट्रीय सामने खेळावेत यासाठी मी त्यांच्याकडे भीक मागू शकत नाही. वेस्ट इंडिजकडून खेळायचे असेल, तर तुम्ही त्यासाठी उपलब्ध असायला हवे.’ जीवनात अनेक बदल होत असतात. खेळाडूंना अनेक ठिकाणी खेळण्याची संधी मिळत आहे. ते वेस्ट इंडिजऐवजी त्यास प्राधान्य देत आहेत. आता हे घडत आहे, त्याला काय करणार अशी खंत सिमन्स यांनी व्यक्त केली. भारताविरुद्धची टी-२० मालिका १-४ गमावलेल्या वेस्ट इंडिजला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेद्वारे संघाची ताकद जाणून घेण्याची संधी आहे; पण न्यूझीलंडविरुद्ध बुधवारी सुरू झालेल्या या मालिकेतही अनेक खेळाडू खेळण्यास तयार नाहीत. आपली उपलब्धता कळवणाऱ्या खेळाडूंतूनच आम्ही निवड करू शकतो. वेस्ट इंडिजमधील सर्वोत्तम खेळाडू संघात असावेत, असे आम्हालाही वाटते. त्यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी आपल्याला उपलब्ध करायला हवे; पण तेच अनुपलब्ध होतात, अशी खंत निवड समितीचे अध्यक्ष डेस्मंड हेन्स यांनी व्यक्त केली. व्यावसायिक लीगऐवजी आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास तयार असलेले खेळाडूच संघात असतील, असेही ते म्हणाले. वर्ल्ड कप टी-२० स्पर्धा ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. वेस्ट इंडिजचे आंद्रे रसेल, सुनील नारायणन हंड्रेड लीगमध्ये खेळत आहेत. त्याचबरोबर एविन लुईस आणि ओशाना थॉमस तंदुरुस्त चाचणीसाठीही अनुपलब्ध होते. वेस्ट इंडिजच्या शेल्डन कॉर्नेल, फॅबियन अॅलन आणि रोस्टन चेस यांना दुखापत झाली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/vNqd7iI
No comments:
Post a Comment