ठाणे : सध्या पावसामुळे रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांची दुर्दशा झाली आहे. ठाण्यात देखील ठिकठिकाणी रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. एकीकडे मुख्यमंत्री सकाळी 6 वाजेपर्यंत काम करतात, असं सांगितलं जातं. मग, सकाळी ६ वाजेपर्यंत काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना रस्त्यांवरील खड्डे दिसत नाही का? असा सवाल ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी उपस्थित केला आहे. ठाण्यातील कोपरी येथील पुलावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते. या दौऱ्यादरम्यान विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाणे शहारत पडलेल्या खड्ड्यांमुळे ठाणेकर नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. मुंबईतून ठाण्यात प्रवेश करताच वाहन चालकांना ठाण्यातील खड्ड्यांना आणि खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांमध्ये आणि वाहनचालकांकडून नाराजीचे वातावरण आहे. आता मुख्यमंत्री हे ठाण्याचे आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री नेहमीच आपल्या ठाण्यातील निवासस्थानी येत असतात. परंतु 6 वाजेपर्यंत काम करणाऱ्या या मुख्यमंत्र्यांना खड्डे का दिसत नाहीत असा सवाल ठाकरे गटाचे शिवसेना खासदार राजन विचारे यांनी उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. काही दिवसापूर्वी मुंबई प्रवेशद्वार जवळील कोपरी पुलावर अपघात होऊन एका दुचाकी स्वाराला जीव गमवावा लागला होता. या अपघाती मृत्यूनंतर नव्याने तयार करण्यात आलेल्या या कोपरी पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. या पुलाच्या पडलेल्या खड्ड्यांची दुरवस्था पाहण्यासाठी ठाणे लोकसभेचे स्थानिक खासदार राजन विचारे यांनी शनिवारी कोपरी पुलाचा पाहणी दौरा आयोजित केला होता. ठाणे शहारत अनेक भागात खड्डे पडले असून कोपरी पुलावर ही खड्याचे साम्राज्य पसरलं असल्याचं खासदार विचारे यांच्या पाहणी दौऱ्यात निदर्शनास आले. या पाहणी दौऱ्यात रेल्वेचे मुख्य प्रकल्प अभियंता लक्ष्मण लोलगे, एमएमआरडीएचे प्रकल्प अभियंता सुर्वे, ठाणे महानगरपालिकेचे अभियंता धनंजय मोदे, सहाय्यक पोलीस आयुक्त वेर्णेकर, तसेच शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक खेडेकर, कोपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डिसोजा, माजी नगरसेवक मधुकर देशमुख, युवासेना अधिकारी किरण जाधव, भारतीय विद्यार्थी सेना संघटक सुनील पाटील, दीपक साळवी व इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावर सकाळी व संध्याकाळी कोपरी रेल्वे पुलाच्या अरुंद मार्गिका असल्याने वाहतूक कोंडीमुळे होणारा खोळांबा टाळण्यासाठी या पूलाचे रुंदीकरणाचे काम एमएमआरडीए व रेल्वे मार्फत सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील चार मार्गिका तयार होऊन ९ ऑक्टोंबर २०२१ रोजी याचा लोकार्पण सोहळा संपन्न होऊन नागरिकांसाठी खुला केला. परंतु दुसऱ्या टप्प्यातील ४ मार्गिका सुरू करण्यासाठी जुना रेल्वे पुल तोडण्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्यामुळे रेल्वे पुलाच्या दोन्ही बाजूस भराव भरण्याचे काम तत्काळ सुरु करा असे त्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना बजावले. काही दिवसापूर्वी या पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे विनीत भालेराव या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्या संदर्भात दोषींवर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित असलेल्या कोपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डिसोजा यांना विचारण्यात आला. सदर व्यक्तीच्या कुटुंबियांस नोकरी किंवा आर्थिक मदत करावी, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे. दरम्यान, खासदार राजन विचारे यांनी ठाणे कोपरी पुलाचा संबंधित अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा केला. अनेक महिने कोपरी पुलाचे काम रखडल्याने खासदार विचारे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. पुलाच्या निकृष्ट कामामुळे विचारे यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. पुलावर पडलेले खड्डे त्वरित भरण्याचे आदेशही दिले. याच पुलावर २ जणांचा जीव गेल्याने अधिकाऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश देत पोलीस अधिकाऱ्यांना देखील विचारे यांनी खडेबोल सुनावले. यावेळी येत्या जानेवारी पर्यंत पुलाचे काम पूर्ण करणार असल्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ysb9jIY
No comments:
Post a Comment