Breaking

Thursday, October 27, 2022

'महाराष्ट्र टाइम्स'चा आजचा अग्रलेख : मौज हवी; जबाबदारी नको https://ift.tt/szGgSJO

उत्साह आणि अतिउत्साह यांतला फरक समजून घ्यायचाच नाही, असे जणू अनेकांनी ठरवूनच टाकले असावे, अशी अवस्था दिवाळीत राज्यातील सर्वच प्रमुख शहरांची झाली होती. दाट वस्ती, मोठमोठ्या इमारती यांमुळे धूर विरळ होण्यास लागणारा उशीर आणि बंदिस्त जागेत फटाके फोडू नयेत या साध्या, सर्वसामान्य संकेताचाही पडलेला विसर यामुळे दिवाळीचे तीन-चार दिवस अनेकांना मनस्ताप झाला. मोठ्या संख्येने लोकांना खोकल्याने हैराण केले आणि विविध ठिकाणी लागलेल्या आगींमुळे मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले. ‘सण उत्साहाने साजरा करा’ अशा शुभेच्छा राज्यकर्त्यांनी दिल्या होत्या, त्याचा अर्थ ‘तुम्ही अगदी निर्धास्त होऊन इतरांना त्रास द्या’ असा होत नाही. मात्र गणेशोत्सवापासूनच सण-समारंभ उत्साहाने साजरे करण्याची शासनाने दिलेली मोकळीक आणि प्रोत्साहन यांच्या गैरवापराचा कळस झाल्याचे दिवाळीच्या चार दिवसांत दिसून आले. ध्वनिप्रदूषणाच्या आणि वातावरण प्रदूषणाच्या पातळीत कमालीची वाढ होण्यास हातभार लावणाऱ्यांमध्ये दुर्दैवाने लहानांसोबत मोठ्यांचाही सहभाग असल्याचे अनेक ठिकाणी पाहावयास मिळत होते. समाज म्हणून प्रदूषणाच्या धोक्यांबाबतचे भान अजूनही आपल्याला येत नाही हे खरोखरच दुर्दैवाचे आहे. करोनाचा कहर ओसरल्यावर जनतेला निर्बंधमुक्त वातावरणाचा आनंद लुटू द्यावा, दोन वर्षांच्या सामाजिक बंदिवासातून झालेल्या सुटकेनंतर मोकळा श्वास घेऊ द्यावा यासाठी शासनाने गणेशोत्सवापासूनच सोहळे साजरे करण्यास प्रोत्साहन दिले होते. खुद्द ‘सरकार’मध्येही ‘सुटका झाल्याची’ भावना प्रबळ होती त्यामुळे यंत्रणांनाही फार ताणून न धरण्याच्या सूचना 'अनधिकृत'पणे दिल्या गेल्या असाव्यात. त्यामुळे मंडपांनी रस्ता व्यापण्यापासून तर दांडियाने घड्याळाच्या काट्यांकडे दुर्लक्ष करण्यापर्यत अनेक प्रकार सुरू होते. त्यातून सामान्य नागरिकांची अडचण झाली तर कोणी त्यावर फारसे भाष्य करत नव्हते. मात्र दिवाळी येता येता ‘उत्सव बहु झाले’ अशी अनेकाची अवस्था झाली आणि फटाक्याच्या धुरांनी आसमंत भरून गेला, अस्थमा, दमा असलेल्या रूग्णांचे श्वास कोंडू लागले तेंव्हा हा ‘अतिउत्साह’ किती तापदायक आहे हे दिसू लागले. दिवाळीच्या दिवसांतल्या ‘सोमवारी’ दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित हवेचे शहर ठरले. मुंबई आणि इतर अनेक शहरांची अवस्थाही फार वेगळी नव्हती. अगदी दिवाळी संपल्यानंतरचा गुरुवार विचारात घेतला तरी त्या दिवशीही दिल्ली आणि मुंबई या शहरांमधील हवेतील प्रदूषणाची पातळी ‘घातक’ आणि ‘अतिघातक’ याच श्रेणींत मोडणारी होती. न्यायालयाने रात्री १०.३० नंतर ‘आवाज’ नको असे जे म्हटले आहे ते केवळ सार्वजनिक सभा-समारंभांपुरते मर्यादित नाही. सार्वजनिक जागी फटाके फोडल्याने होणाऱ्या आवाजालाही हे बंधन लागू होते. मात्र या नियमाचे सर्रास उल्लंघन होताना दिसत होते. मध्यरात्री एक-दीड वाजेस्तोवर मोठ्या आवाजाचे फटाके फोडले जात होते. अनेक ठिकाणी तर ‘उठा उठा पहाट झाली, फटाके फोडायची वेळ झाली’ असे सांगून ठेवले आहे की काय, असे वाटण्याजोगी स्थिती होती. कुणाच्या घरात लहान बाळे असतील, वृद्ध व्यक्ती असतील, कुणी काम करुन रात्री उशिरा झोपले असेल याची कुठलीही तमा न बाळगता पहाटे पाच वाजताच सुतळी बाँम्ब, तेही पाठोपाठ फोडणारांना विकृत आनंद मिळत असावा. हवेत उंच जाण्याऐवजी दिशा बदलून आडवी धाव घेणारी रॉकेट्स, फुसका आहे असे वाटल्याने दुर्लक्ष झाल्यावर अचानक फुटणारा बॉम्ब, ‘ठिणग्याचा पाऊस’ पाडण्याऐवजी अचानक आवाज करीत फुटणारे फटाके अशांनी राज्यभरात पन्नासहून अधिक ठिकाणी छोटया छोट्या आगी लागल्या. नेहमीच्या तुलनेत यावर्षी फटाक्यांमधून निघणाऱ्या धुराचे प्रमाण अधिक होते, असे निरीक्षण काहींनी नोंदवले आहे. त्याचे कारण काय असेल ते असो, परंतु संध्याकाळच्या वेळी जणू धुके साचावे तसा धुराचा पडदा अनेक ठिकाणी दिसत होता, हे खरे आहे. त्याचा अनेकांना त्रासही झाला. करोना संपल्यावर कपाटात जाऊन पडलेले मास्कही या धुरामुळे बाहेर आल्याचे काही ठिकाणी दिसत होते. विदेशातील अनेक ठिकाणी शहराबाहेरील एखाद्या मोकळ्या मैदानात फटाके फोडण्याची, आतषबाजी करण्याची जागा निश्चित केली जाते. ज्यांना हौस भागवायची असेल त्यांना त्याच ठिकाणी जाऊन फटाके फोडावे लागतात. दाट वस्ती आणि उंच इमारती असणाऱ्या मोठ्या शहरांमध्ये अशी काही मैदाने ठरवली गेली तर अनेकांचा त्रास वाचेल. अनेक सोसायट्यांमध्ये आतली मोकळी जागा, मजल्यांवर मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागा, पार्किंगच्या बाजूला मुले फटाके फोडताना सर्रास दिसतात. त्यांच्या कुटुंबियांना त्यातला धोका दिसत नाही आणि दाखवून दिलेला आवडत नाही, अशी आपली एकूण सामाजिक मानसिकता आहे. त्यामुळेच रस्त्यात झालेला ‘फटाक्यांचा कचरा’ फटाक्यांची रिकामी झालेली पिशवी आणि विझलेल्या, अर्धवट वितळलेल्या मेणबत्त्यांची कलेवरे तशीच रस्त्यावर टाकून आपण उत्सव साजरा करतो. ‘मौज हवी, जबाबदारी नको’ या भावनेचा लोप होईल तेव्हाच दिवाळीचा खरा प्रकाश पसरेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Sf9F2E5

No comments:

Post a Comment