Breaking

Tuesday, November 15, 2022

वाचाळ मंत्र्यांना आवरा; विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आवाहन https://ift.tt/GjvgOBF

मुंबई : ‘मंत्र्यांनी जबाबदारीचे भान ठेवून बोलले पाहिजे. मंत्रीमंडळातील वाचाळांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आवरायला हवे. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपली गेली पाहिजे,' असे आवाहन विरोधी पक्षनेते यांनी मंगळवारी केले. सत्ताधाऱ्यांमुळे राज्यातील पोलीस तणावाखाली असून, सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. ‘तुमच्यामध्ये वाचाळांचे प्रस्थ वाढले आहे. काही मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे मंत्रीमंडळाची प्रतिमा खराब होत आहे. नागरिक सर्व पाहत असतात. तुम्ही सहज बोलायला सामान्य नागरिक नसून, राज्याचे प्रतिनिधी आहात. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जबाबदारीही येत असते. मध्यंतरी अब्दुल सत्तार हे माझी बहीण सुप्रिया सुळे हिला काही बोलले. विनाशकाले विपरित बुद्धी असेच याबाबत म्हणावे लागेल,’ असे पवार म्हणाले. ‘अंबरनाथमध्ये दोन गटांत गोळीबाराची घटना बैलगाडी शर्यतीत घडली. ठाण्यात किसननगर भागात शिंदे-ठाकरे गटांत राडा झाला. अशी राडेबाजी करून चालणार नाही. पोलिसांना अन्य बाबींपेक्षा याकडेच जास्त लक्ष द्यावे लागेल. किती लोकांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे याची माहिती माहितीच्या अधिकारात मागवली आहे. त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा आवश्यक होती का? हा तुमचा नव्हे तर कर रूपाने जमा झालेला नागरिकांचा पैसा आहे,’ अशी टीका त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. इतिहासाची मोडतोड करू नका. ‘हर हर महादेव’ हा चित्रपट तज्ज्ञांना घेऊन बघेन व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्याबाबत माहिती देईन, असे त्यांनी शेवटी नमूद केले. 'सत्ता गेल्यामुळे अजित पवार अस्वस्थ' राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सत्ता गेल्यामुळे अस्वस्थ आहेत. त्यांच्या पक्षातही प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते असल्याचे दाखविण्यासाठी ते काही तरी आरोप करत असल्याचे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ‘राज्याचे गृहमंत्रीपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांच्या कार्यकाळात राज्य सरकारने गुंडाराज संपविले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मात्र बलात्काऱ्याला संरक्षण देण्यात आले, गृहमंत्र्याला तुरुंगात जावे लागले, मंत्र्यांच्या बगलबच्च्यांना पोलीस सुरक्षा दिली, राज्यातील पोलिसांचे खच्चीकरण करण्यात आले, चांगल्या अधिकाऱ्यांना बाजूला केले. त्यामुळे पवार यांना बोलण्याचा अधिकार नाही,’असेही ते म्हणाले. आघाडी सरकारच्या काळात तर तत्कालीन मुख्यमंत्री काचेच्या भिंतीमध्ये असायचे, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/wXKHa1T

No comments:

Post a Comment