मुंबई : सुरक्षित प्रवासी वाहतुकीसाठी ५,१५० विद्युत बस घेणे, सीएनजीऐवजी २ हजार डिझेल वाहनांचा समावेश करणे, वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती यांसह एकूण २६ विषय असलेल्या संचालक मंडळाची बैठक सलग दुसऱ्यांदा रद्द झाली. अध्यक्ष नसल्याने निर्णय प्रक्रिया रखडली आहे. राज्यात नोकरभरतीच्या हालचालींना वेग आलेला असताना एसटी महामंडळावर अध्यक्ष देता का अध्यक्ष, असे म्हणण्याची वेळ ओढावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाचा मर्यादित विस्तार झाला आहे. अनेक महामंडळाचे अध्यक्षपद रिक्त आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यांना वेळ नसल्याने ४ नोव्हेंबर आणि २८ ऑक्टोबर या दिवशी होणाऱ्या बैठका रद्द झाल्या. विशेष म्हणजे, या दोन्ही बैठका पूर्वनियोजित होत्या. मुख्यमंत्री सचिवालयाने बैठकीची तारीख-वेळ निश्चित केली होती. एसटी महामंडळात हजारो गाड्यांचा तुटवडा आहे. अनेक गाड्यांचे आयुर्मान पूर्ण झाले आहे. या गाड्या धावत्या असल्याने त्याचा फटका प्रवाशांना आणि एसटीच्या उत्पन्नावर होत आहे. महामंडळाचे धोरणात्मक निर्णय संचालक मंडळात घेण्यात येतात. अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवी अधिकाऱ्यांच्या चर्चेअंती प्रवासीहिताचे आणि एसटीसाठी योग्य असलेले निर्णय घेण्यात येतात. यामुळे संचालक मंडळाच्या बैठकी होणे गरजेचे असते, असे एसटीतील अधिकारी सांगतात. वादग्रस्त निर्णयाला मंजुरी ? महाविकास आघाडी सरकारच्या काळात संबंधित मंत्र्यांनी मर्जीतील अनेकांना करार पद्धतीने भरमसाठ मानधन देऊन एसटी महामंडळातील मोक्याच्या ठिकाणी भरती केले. त्यांना मुदतवाढही देण्यात आली. करोना आणि संपामुळे त्यासाठी संचालक मंडळाची मंजुरी घेण्यात आलेली नव्हती. तत्कालीन विरोधी पक्षाने यावर टीकेची झोड उठवली होती. यंदाच्या बैठकीत करार पद्धतीने नियुक्तीस मंजुरी देण्याबाबतचा विषय आहे. या वादग्रस्त निर्णयाला मंजुरी मिळणार का, याकडे लक्ष आहे. बैठकीअभावी रखडलेले निवडक विषय - भाडेतत्वावरील ५,१५० विद्युत बससाठी प्रस्ताव - सीएनजीऐवजी २ हजार डिझेल वाहनांचा समावेश करणे - १८० साध्या बससाठी पुरवठादारांची नियुक्ती - महागाई भत्त्यांच्या दरात वाढ करणे - एसटी अधिकाऱ्यांना सुधारित वेतनवाढ - ईटिआयएम प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कंपनीची निवड - आधुनिक तंत्रज्ञानाने एसटी महामंडळाच्या संकेतस्थळाचा विकास - करोना, संपकाळात वाणिज्य आस्थापनांच्या परवान्याबाबत निर्णय - नाशिक येथील मोकळी जागा भाडेतत्त्वार देण्याबाबत - एसटीच्या पार्सल-कुरिअर सेवेतील कंपन्यांना मुदतवाढ देण्याबाबत
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LgNEo4K
No comments:
Post a Comment