मुंबई : अंधेरीतील गोखले पूल जुना झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेवरील प्रवासी संख्येत ११ हजारांनी वाढ झाली आहे. यामुळे करोनानंतर मेट्रो १ मार्गिकेची दैनंदिन प्रवासी संख्या प्रथमच चार लाखांवर पोहोचण्याची चिन्हे आहेत. तसेच गोखले पूल दुरुस्तीकामासाठी पुढील दोन वर्षे बंद राहणार असल्याने यात आणखी वाढीची अपेक्षा मेट्रो १ प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. अंधेरी पूर्वेला पश्चिमेशी व तेथून पुढे वर्सोवा आणि पश्चिम भागाला जोडण्यासाठी गोखले पूल महत्त्वाचा आहे. तो बंद करण्यात आल्याने अंधेरीहून वर्सोवाकडे जाणाऱ्या मेट्रोवरील भार वाढला आहे. सोमवारी संध्याकाळी ५पर्यंत प्रवासी संख्येत ११ हजारांनी वाढ झाली होती. यामध्ये सर्वाधिक प्रवासी वाढ अंधेरी पश्चिमेकडील आझाद नगर मेट्रो स्थानकावर आहे. त्याखालोखाल डी. एन. नगर आणि वर्सोवा मेट्रो स्थानकावरही प्रवाशांची संख्या वाढली आहे. ही वाढ लक्षात घेऊन गरज भासल्यास अतिरिक्त मेट्रो गाड्या सोडण्यात येणार आहे. करोनापूर्वी मेट्रो १मधून दरदिवशी ४ लाख ते ४ लाख ५० हजार नागरिक प्रवास करत होते. करोना लॉकडाउनमध्ये मेट्रो सेवा बंद करण्यात आली. बंदकाळानंतर १८ ऑक्टोबर, २०२०पासून पुन्हा मेट्रो धावू लागली. मेट्रो प्रवास पुन्हा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला केवळ १३ हजार प्रवासीच होते. त्यानंतर गेल्या वर्षी फेब्रुवारीत प्रवासी संख्या वाढून १ लाखापर्यंत पोहोचली. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा कडक निर्बंध लागू केल्यामुळे प्रवासी संख्या ५० हजारांहून कमी झाली. त्यानंतर गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने मेट्रोची प्रवासी संख्या करोनानंतर प्रथमच २ लाखांपुढे गेली होती. गेल्या काही महिन्यांत संख्या ३ लाख ५० हजार ते ३ लाख ८० हजार यादरम्यान होती. मात्र आता गोखले पूल बंद केल्याने प्रवासी मेट्रोकडे वळण्याची चिन्हे आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/a0XewLJ
No comments:
Post a Comment