मुंबई : आरे कॉलनीत बिबट्याचे अस्तित्व तर आहेच, मात्र ते नुसतेच अस्तित्व नसून ते मानवासोबतचे असल्याचे कॅमेरा ट्रॅप छायाचित्रामुळे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील एका पोलीस हवालदाराने बिबट्याट्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी आदिवासी कुटुंबाच्या घराबाहेर लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्रामुळे हा संदेश पोहोचवला आहे. या वन्यजीव आणि मानवाचे सहअस्तित्व दर्शवणाऱ्या अनोख्या छायाचित्राला 'नेचर इन फोकस'चा पुरस्कार मिळाला आहे. पोलीस हवालदार योगेंद्र साटम यांच्या कॅमेरा ट्रॅप इमेजमध्ये रात्रीच्या वेळी एका आदिवासी कुटुंबाच्या घराबाहेर आला असल्याचे दिसत आहे. या वेळी घरातील लोक गाढ झोपेत होते. बिबट्या आदिवासी कुटुंबाच्या घराच्या समोरच्या अंगणात फिरताना दिसतो. घरातील विविध वस्तू न्याहाळात काही भांडी आणि बाजूला ठेवलेल्या एका लोखंडी खाटाच्या आजूबाजूला तो पाहत असल्याचे दिसत आहे. ३५ वर्षीय हवालदार योगेंद्र साटम हे वन्यजीव प्रेमी आहेत. साटम हे लहानपणी नेहमी आरे कॉलनीतील त्यांच्या मित्राला भेटायला जात असतं. तेव्हा ते जंगलात जात असत. त्यावेळी त्यांनी अनेकदा काही अंतरावर बिबट्या शांतपणे फिरताना पाहिले असल्याचे ते सांगतात. काही वर्षांपूर्वी, ते आरेमधील मित्राच्या घरी गेले असताना त्यांना त्याच्या घराजवळ बिबट्या आल्याच्या खुणा दिसल्या, साटम सांगतात. 'त्याच्या घराच्या बाहेरच चिखलाच्या वाटेवर पगमार्क होते, ते आठवते, रात्रीच्या वेळी बिबट्या घराजवळ येत असे.तेथे आदिवासी कुटुंबाने कोंबड्या पाळल्या होत्या आणि त्या ठिकाणी कुत्रे देखील होते. साटम यांना घराजवळ बिबट्या येत असल्याच्या खुणा दिसत होत्या. मात्र बिबट्या घराजवळ कधी दिसला नव्हता. तेव्हा साटम यांनी त्या ठिकाणी घराच्या व्हरांड्यात फोकस असलेला कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतला. कॅमेरा ट्रॅपिंगसाठी त्यांनी त्यांचा मित्र कपिल शर्मा या व्यावसायिक छायाचित्रकाराकडून मार्गदर्शनही घेतले. साटम म्हणतात, कॅमेरा खोटे बोलत नाही. त्याने चित्रे टिपलीच. मध्यरात्रीनंतर ठिकठिकाणी बिबट्या कसा वावरत होता हे सगळे कॅमेऱ्यात कैद झाले. साटम यांचे जुळे भाऊ, पोलीस हवालदार योगेश साटम, फोर्स वन कमांडो ओंकार सातंबेकर आणि इतर दोन वन्यजीव प्रेमी अथर्व वसईकर आणि शर्मा यांनी बिबट्याचे पगमार्क शोधण्याची मोहीमच हाती घेतली. गावाभोवती बिबट्याच्या विष्ठेसारख्या इतर चिन्हेही ते शोधत होते. परंतु अशा प्रकारे कॅमेरे लावल्यामुळे त्यांना मानव आणि जंगली जनावरे यांच्यातील शांततापूर्ण सहअस्तित्व दर्शविणारा पुरावा सापडला. याच छायाचित्राने साटम यांना नेचर इन फोकसचे पारितोषिक मिळवून दिले. त्यात प्रशस्तीपत्र आणि रोख पारितोषिकाचा समावेश आहे. वन्यजीवांचे मानवासोबतचे सहअस्तित्व दर्शवणारे छायाचित्र - छायाचित्रकाराकडून स्पर्धेबाबत मिळाली माहिती वन्यजीव प्रेमींचा संपूर्ण गट या पुरस्कारामुळे आनंदित झाला आहे. जीवनात आलेले असे टप्पे तुम्हाला वन्यजीव आणि पर्यावरणासाठी काम करण्यास प्रोत्साहित करतात, असे साटम म्हणतात. या फोटोग्राफी स्पर्धेबद्धल कपिल शर्मा या फोटोग्राफरकडून मला माहिती मिळाली आणि आम्ही त्या स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवले, अशी माहितीही साटम यांनी दिली. पोलीस हवालदार योगेंद्र बाबाजी साटम आणि योगेश बाबाजी साटम हे त्याचे जुळे भाऊ एकत्र पोलीस दलात २००९ साली भरती झाले. गेली १२ वर्षे ते मुंबई पोलीस दलात शिपाई या पदावर काम करत आहेत. दोघे अंधेरी पूर्व येथील मरोळ पोलीस वसाहतीमधे बऱ्याच वर्षापासून राहत आहेत. मरोळ पोलीस वसाहत आरे कॉलोनीच्या लगत असल्याने तेथील वन्यजीवन ते लहानपणापासून बघत आले आहेत. पोलिसात भरती होण्यापूर्वीपासून योगेंद्र साटम यांना वन्यजीवन फोटोग्राफीची आवड होती. वन्यजीवनाबद्दल अभ्यास असल्यामुळे याची त्यांना फोटोग्राफीमधे मदत झाली. साटम सांगतात, 'पोलीस दलात कार्यरत असताना मी आरे कॉलोनी परिसरातून विविध जातीच्या कोळ्याचे (Spider) संशोधन केले आहे . तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या फोटोथोन (Photothon) या फोटोग्राफीच्या स्पर्धेत मला २ वेळा परितोषिक मिळाले आहे. २०२१-२०२२ मधे 'नेचर इन फोकस' यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत मी आणि माझ्या सहकारी मित्रांनी सहभाग घेतला होता. त्या आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत आम्हाला यावेळी २ पारितोषिके मिळाली. कॅमेरा ट्रॅप फोटोग्राफी मधेमला मदतीस म्हणून माझा जुळा भाऊ योगेश साटम तसेच फोर्स वन कमांडो ओंकार सातांबेकर आणि वाइल्डलाईफ फोटोग्राफर कपिल शर्मा आणि अथर्व वसईकर हे नेहमी सोबत असत.' या स्पर्धेतून मुंबई पोलीस दलाचे नावलौकिक वाढविण्याची संधी मला मिळाली. यापुढे देखील मी माझे कर्त्यव बजावत असताना आपल्या मुंबई पोलीस दलाचे नाव उंचावेल यासाठी प्रयत्नशील राहीन, असे साटम यांनी म्हटले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/eWQJCnq
No comments:
Post a Comment