नागपूर : 'पुनर्विकास नियमातील फेरबदल सूचना काढल्यामुळे आता मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास आता शक्य होणार आहे,' अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. तर ' प्रकल्पात निवासी आणि व्यावसायिक (अनिवासी) अशा ५९ हजार कुटुंबांचे पुनर्वसन केले जाणार आहे. याशिवाय २०११ नंतरच्या अपात्र व्यक्तींना आम्ही भाडेतत्त्वावर घरे बांधून देणार आहोत. कालांतराने ही घरे त्यांच्या नावावर केली जातील,'अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. यामुळे मुंबईतील पुनर्विकासाला चालना मिळणार आहे. म्हाडाने पुनर्बांधणी केलेल्या ३८९ इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग पुनर्विकास नियमातील फेरबदल सूचना काढल्यामुळे मोकळा झाला आहे. धोकादायक किंवा किमान ३० वर्षेजुन्या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन मालकी तत्त्वावर ३०० चौरस फूट चटई क्षेत्राच्या सदनिकेत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. म्हाडाने पुनर्बांधणी केलेल्या ३८९ इमारतींच्या पुनर्विकासाच्या नियमावलीत स्वतंत्र तरतुदींना मान्यता देण्यात आली आहे. मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत नवीन तरतूद करण्यात आली आहे. या फेरबदलाची अधिसूचना काढण्यात आली आहे. मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारतींचा म्हाडाने विकास करून त्यातील गाळे भाडे तत्त्वावर रहिवासासाठी देण्यात आले होते. या ३८९ इमारतीत असणाऱ्या सुमारे ३० हजारपेक्षा जास्त सदनिका आणि सुमारे दीड लाख रहिवासी १८० ते २२५ चौरस फूट किंवा जास्त क्षेत्रफळाच्या सदनिकेत राहत होते. म्हाडाने या पुनर्रचित केलेल्या असल्याने या इमारती उपकरप्राप्तमध्ये येत नव्हत्या. त्यामुळे या इमारतींचा विकास करण्यासाठी विकासक पुढे येत नव्हते. तसेच इतर तांत्रिक अडचणींमुळे पुनर्वसन शक्य होत नव्हते. आता नव्या नियमांच्या तरतुदीमुळे धोकादायक किंवा किमान ३० वर्षे जुन्या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन मालकी तत्त्वावर ३०० चौरस फूट चटई क्षेत्राच्या सदनिकेत करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचवेळी, 'धारावी पुनर्विकास प्रकल्पात निवासी आणि अनिवासी अशा ५९ हजार कुटुंबांचे पुनर्वसन केले जाणार आहे. कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. ज्यांची जेवढी जागा आहे त्यापेक्षा अधिकचीच जागा दिली जाईल. याशिवाय २०११नंतरच्या अपात्र कुटुंबांनाही आम्ही भाडेतत्त्वावर घरे बांधून देणार आहोत. कालांतराने ही घरे त्यांच्या नावावर केली जातील,' अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत लोकांच्या शंकांचे निरसन करणारी एक खिडकी योजनेसाखरी व्यवस्था केली जाईल. तसेच धारावीतील पाच हजार उद्योगांची वेगळी व्यवस्था करताना, त्यांना पाच वर्षांसाठी करातून सूटही देण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. काँग्रेसच्या धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत धारावी पुनर्विकास प्रकल्पबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी गायकवाड यांनी धारावी पुनर्विकासाला बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेप्रमाणे २०११चा निकष लावण्यात यावा अशी मागणी केली. बांधकामाच्या किंमतीइतके पैसे आकारले गेले, तर ते देखील देण्याइतकी धारावीतल्या नागरिकांची ऐपत नाही. शिवाय त्यांना इमारतीच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च आकारण्यात येऊ नये, प्रकल्पाची माहिती देण्यासाठी, स्थानिकांच्या शंका दूर करण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करावी, आदी मागण्या केल्या. धारवीचा पुनर्विकास करताना नागरिकांना संक्रमण शिबिरात पाठवू नये, असा आग्रहही गायकवाड यांनी धरला. यावेळी उत्तर देताना फडणवीस यांनी, धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबतसविस्तर माहिती दिली. राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला धारावी पुनर्विकास हा नागरी प्रकल्प देशातील नव्हे, तर जगातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पात ४६ हजार १९१ निवासी, तर १२ हजार ९७४ अनिवासी अशा एकूण ५९ हजार १६५ कुटुंबाचे पुनर्वसन केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी निविदा काढताना सरकारला आर्थिक फायदा व्हावा असा हेतू न ठेवेता, गलिच्छ वस्तीत राहणाऱ्या लोकांचे पुनर्वसन करून त्यांना आहे त्यापेक्षा अधिक चांगले देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. रेल्वेची जागा मिळाल्यानंतर महाधिवक्त्यांच्या सल्ल्याने नव्याने निविदा काढली. स्पर्धा व्हावी या हेतूने काही नियम बदलले. या निविदेत जुनी निविदा भरलेल्यांना संधी होती, पण त्यांनी निविदा भरली नाही, असे फडणवीस म्हणाले. धारावी हे 'बिझनेस हब' असून, त्याकडे दुर्लक्ष करून पुनर्विकास करणे शक्य नाही. धारावीचे मुंबईच्या विकासातील आर्थिक योगदानही नजरेआड करता येत नाही. त्यामुळे पुनर्विकासात औद्योगिक आणि व्यावसायिक अशी दोन क्षेत्रे ठेवली आहेत. कामगारांना धारावीत गलिच्छ वातावरणात काम करावे लागते. त्यामुळे लघु उद्योगांना आहे त्यापेक्षा जास्त जागा आणि सुविधा देऊन पुनर्विकास केला जाणार आहे. धारावीतील उद्योगांना पाच वर्षांपर्यंत सर्व कर माफ केले आहेत. उद्योगांना जीएसटी परतावा आणि इतर प्रोत्साहन अनुदान दिले जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या तारखेनुसार धारावीतील सर्व धार्मिक स्थळे संरक्षित केली जातील, असेही त्यांनी सांगितले. २०११नंतरच्या अपात्रांनाही घरे 'धारावीचे पुनर्वनस करताना २०११पर्यंतच्या बांधकामांना संरक्षण आहे. मात्र, आम्ही २०११नंतरच्या अपात्रांनाही वाऱ्यावर सोडणार नाही. २०११नंतरच्या लोकांना मोफत घर देता येत नसले, तरी त्यांना भाडेतत्त्वावरील घरे आम्ही बांधून देणार आहोत. पुढे कालांतरांनी ही त्यांच्या नावावर करता येतील. धारावीच्या पुनर्विकासात कोणालाही वगळण्यात येणार नाही. नवीन जागा देताना अधिक फंजीबल चटई निर्देशांकही दिला जाईल. त्यामुळे येथील कुटुंबांना आहे त्या जागेपेक्षा जास्तीच जागा मिळणार आहे,' असेही फडणवीस यांनी सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/0drGfeQ
No comments:
Post a Comment