Breaking

Monday, December 5, 2022

ती संधी राहुल गांधींनी साधली नाही; ईव्हीएमबाबत संविधान समर्थक दल काँग्रेसचे अध्यक्ष खरगेंना भेटणार https://ift.tt/couVzgs

मुंबई : निवडणुकांसाठी मतदान पद्धती काँग्रेस राजवटीतच लागू करण्यात आल्यामुळे त्याविरोधात बोलण्याचे नैतिक धैर्य त्या पक्षाकडे नाही, ही काँग्रेसची अडचण समजू शकते, असे सांगतानाच देशातील जनतेच्या ईव्हीएम विरोधाची कदर करून 'पुन्हा सत्तेवर आल्यास ईव्हीएम आणण्याची घोडचूक सुधारण्यात येईल', असे आश्वासन जाहीरनाम्यात समाविष्ट करण्याचा निर्णय काँग्रेसने जाहीर करावा, अशी मागणी 'संविधान समर्थक दला'तर्फे करण्यात आली आहे. त्यासाठी एक शिष्टमंडळ काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भेटीसाठी लवकरच जाणार आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंगळवारी होणाऱ्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. हे पत्रक प्राचार्य रमेश जाधव, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, प्रा एकनाथ जाधव, सतीश डोंगरे, रमेश मोकळ, कामगार नेते सीताराम लव्हांडे यांनी काढले आहे. संविधानकारांनी पसंतीचे लोकप्रतिनिधी, शासनकर्ते निवडण्याचा आणि निवड चुकल्यास त्यांना बदलण्यासाठी मतदानाचा अधिकार देऊन जनतेला सामर्थ्यवान बनवले आहे. मात्र ईव्हीएम म्हणजे मतदानाचा अधिकार काढून घेणारे यंत्र ठरले आहे, असा स्पष्ट आरोप संविधान समर्थक दलाने केला आहे. कुणाला विजयी करायचे, कुणाला पराभूत करायचे आणि पोटनिवडणुका तसेच छोट्या राज्यांत विजय विरोधकांच्या झोळीत टाकण्याचे 'व्यवस्थापन' सत्ताधारी पक्षाला ईव्हीएमद्वारे शक्य होते, हे अनेक निकालातून अधोरेखित झाले आहे, असे पत्रकात म्हटले आहे. जगातील १९४ राष्ट्रांपैकी १२० देशांमध्ये निवडणुका मतदान पत्रिकेद्वारेच पार पडत आहे. तसेच इंग्लंड, फ्रान्स, इटाली, जर्मनी, आयर्लंड, नेदरलँड, कॅलिफोर्निया या देशांनी ईव्हीएम पद्धती बंद करून मतदान पत्रिकेचा स्वीकार केलेला आहे. मग भारतामध्येच ईव्हीएम पद्धतीला बिलगून बसण्याचा अट्टाहास कशासाठी,असा सवालही संविधान समर्थक दलाने विचारला आहे. तसेच ईव्हीएमद्वारे केल्या जाणाऱ्या मतदानाबाबतचा संशय दूर करण्यासाठी व्हीव्हीपिटी स्लिप मिळण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी निकाल वादग्रस्त ठरल्यास त्या स्लीपांची मोजणी करण्यास देण्यात येणाऱ्या नकारामुळे ईव्हीएमबद्दलचा संशय अधिकच गडद झाला आहे, असे मत संविधान समर्थक दलाने व्यक्त केले आहे. काँग्रेसचे नेते यांची ' भारत जोडो यात्रा' सध्या सुरू असून तिला सर्वत्र दांडगा प्रतिसाद मिळत आहे. पण त्यांनी आपली ही यात्रा ईव्हीएम हटाओ जन यात्रा बनवली असती तर ईव्हीएमविरोधी जनभावना प्रखरपणे राष्ट्रीय पातळीवर व्यक्त व्यक्त झाली असती. ती संधी राहुल गांधी यांनी साधली नाही. आता कॉंग्रेसच्या २०२४ च्या जाहीरनाम्यात त्या जनभावनेची दखल घेण्यात यावी, असे संविधान समर्थक दलाचे म्हणणे आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/CeBsrcZ

No comments:

Post a Comment