मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जातं आहे. अधिवेशनाआधी होणारा मंत्रिमंडळ विस्तार आता अधिवेशनानंतर होण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील आणि भाजपा मधील नेत्यांना मंत्रिपदासाठी आणखी वाट पाहावी लागणार, अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावाद चालू आहे त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तारावर परिणाम झाल्याचं बोललं जात आहे. सीमा वादाची किनार मंत्रिमंडळ लांबणीवर पडण्यास आहे, अशी शक्यता आहे. अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असं सांगण्यात आलं होतं आणि त्याची तयारी देखील करण्यात आली होती. मंत्रिमंडळ आणि महामंडळ वाटपासंदर्भात नेत्यांकडून बायोडेटा मागवण्यात देखील आला होता. संबंधित नेत्यांचे बायोडेटा हे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील पोहचले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, छत्रपती शिवाजी महाराजांसदर्भातील राज्यपालांचं वक्तव्य, भाजप नेत्यांची काही वक्तव्य, विरोधी पक्षांकडून करण्यात येणार असलेली आंदोलन या पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकण्यात आल्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या अखेरीला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी नागपूरला येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकण्यात आल्याचं कळतंय. इच्छुकांना वाट पाहावी लागणार राज्यात शिंदे फडणवीसांचं सरकार स्थापन झालं त्याला आता पाच महिने पूर्ण झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करण्यात आला होता. त्यानंतर दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ३० जूनला शपथ घेतली होती. त्यानंतर ऑगस्टमध्ये १८ मंत्र्यांना शपथ देण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात एकूण ४३ मंत्र्यांचा समावेश करता येतो. त्यामुळं आता आगामी काळातील विस्तारात शिंदे गटाला आणि भाजपला किती मंत्रिपदं मिळणार याकडे इच्छुकांसह सर्वाचं लक्ष लागलं आहे. मंत्रिपदाची तहान महामंडळावर भागवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील अनेक आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. दुसरीकडे सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपमधील अनेक आमदार मंत्रिपदाकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळं ज्यांना मंत्रिपदं मिळणार नाही त्यांना महामंडळावर संधी देत त्यांचं पुर्नवसन केलं जाण्याची शक्यता आहे. आता महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/F215tB6
No comments:
Post a Comment