पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात आज आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. पाटील यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र शाईफेकीचा प्रकार घडल्यानंतर भाजपच्या गोटातून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आल्या. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याच्या विपर्यास करून चुकीचे अर्थ काढले जात आहेत, असा आरोप भाजपकडून होत आहे. मात्र या सगळ्या गोंधळात चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणारे कार्यकर्ते नेमक्या कोणत्या संघटनेचे होते, याबाबतही आता चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाईफेक करणारे कार्यकर्ते हे समता सैनिक दल या संघटनेचे होते. समता सैनिक दलाच्या मनोज गरबडे या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकल्याचं सांगितलं जात आहे. गरबडे हा अनेक वर्षांपासून समता सैनिक दलात कार्यरत आहे. तो चिंचवड परिसरात वास्तव्याला आहे. तसेच तो अनेक सामाजिक कार्यात देखील कार्यरत आहे. कट्टर आंबेडकरवादी विचारांचा कार्यकर्ता म्हणून मनोज गरबडे याची ओळख असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्याने चंद्रकांत पाटलांवर शाईफेक केल्याचे समजते. या घटनेनंतर पोलिसांकडून त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्ते चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. दरम्यान, या घटनेबाबत पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. काय आहे चंद्रकांत पाटील यांची बाजू? शाईफेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. 'माझ्यावरचा हल्ला म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे. प्रत्येकाने आपलं मत मांडायचं, ज्याला आवडलं नाही त्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करायचं, बाबासाहेबांनी हे तत्व आयुष्यभर जपलं. पण आज माझ्यावर शाई फेकून ही लोकशाही नव्हे तर झुंडशाही असल्याचं विरोधी पक्षांनी दाखवून दिलं. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी घाबरत नाही,' असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/DHbk4E1
No comments:
Post a Comment