Breaking

Sunday, December 11, 2022

मुंबईची हवा बिघडवतेय फुफ्फुसांचे आरोग्य; वाढत्या प्रदूषणामुळं आरोग्याला धोका, तज्ज्ञाचा सल्ला ऐकाच! https://ift.tt/pzXFY03

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई: मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता ढासळत असल्याचे वारंवार समोर येत आहे. तसेच प्रदूषणामध्ये वाढ झाल्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की हवेची गुणवत्ता ढासळल्यामुळे फुफ्फुसाचे विकार असलेल्या व्यक्तींना प्रकृतीच्या अधिकाधिक तक्रारी निर्माण होण्याचा धोका असतो. हवेची गुणवत्ता खराब झाल्यामुळे सामान्यांना श्वासोच्छ्वासाच्या आजारांसह इतर आजार होण्याची शक्यताही वाढली आहे. करोनामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या फुफ्फुसांचे आरोग्य सर्वाधिक बाधित झाले. रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते आहे. फुफ्फुसांच्या आरोग्याबद्दल बोलताना मुंबईतील फिजिशियन डॉ. छाया वजा यांनी सांगितले, की हवेतील प्रदूषणामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो. वायुप्रदूषणातील विषारी प्रदूषकांमुळे श्वसन संक्रमणापासून आणि हृदयरोगापर्यंत अनेक आजार होतात. सर्वाधिक जोखीम असलेल्या व्यक्तींमध्ये मुले, वृद्ध, प्रौढ आणि कमकुवत फुफ्फुस असलेल्या व्यक्तींचा समावेश होतो.’ फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ. तन्वी भट्ट यांनी, शरीरातील सर्व अवयव हे फुफ्फुसाद्वारे पुरवठा होणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर अवलंबून असतात. प्रदूषित हवेत श्वास घेतला तर त्यामुळे केवळ फुफ्फुसांवरच नव्हे तर इतर अवयवांच्या कार्यक्षमतेवरही त्याचा परिणाम होतो, असे सांगितले. दूषित हवेमुळे अॅलर्जीचे विकार, दमा, ब्राँकायटिस, सीओपीडी, करोनानंतरच्या स्थितीत असलेल्या रुग्णांना धोका असतो. दूषित हवेमुळे होणारे विकार रोखण्यासाठी प्राणायाम आणि श्वसनाशी संबंधित व्यायाम करणे गरजेचे आहे, असा सल्ला त्यांनी दिला. प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. श्वासोच्छ्वास करताना त्रास बांधकाम क्षेत्रात सुरू असणारी कामे, वाहनातून बाहेर पडणारा धूर, औद्योगिक प्रदूषण, इंधन जाळणे तसेच जंगलतोड यामुळे वायूप्रदूषणाची पातळी वाढते. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होतो. वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसाचे कार्य बिघडते. यामुळे दमा, सीओपीडी यासारख्या आजारांबरोबरच श्वासोच्छ्वासाची समस्यादेखील उद्भवते. लहान मुलांबाबत सांगायचे झाल्यास प्रदूषणामुळे फुफ्फुसांची वाढ खुंटते आणि भविष्यात श्वसनासंबंधी आजार होण्याचे प्रमाण वाढते, याकडे तज्ज्ञांनी खास लक्ष वेधले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/nhoGAXP

No comments:

Post a Comment