Breaking

Thursday, December 15, 2022

मोर्चासाठी महाविकास आघाडीची रणनीती; राज्यभरातून मुंबईत मोर्चेकरी आणण्याचे नियोजन https://ift.tt/RXIy1pP

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः 'छत्रपती शिवाजी महाराजांचा सतत अपमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यातील जनतेत प्रचंड असंतोष आहे. त्या असंतोषाला तोंड फोडण्यासाठी येत्या शनिवारी, १७ डिसेंबर रोजी मुंबईत निघणाऱ्या मोर्चाला राज्यातील जनतेने मोठा प्रतिसाद द्या', असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे; तर, 'हीच वेळ आहे जागे होण्याची, महामोर्चात सहभागी होण्याची', अशी भावनिक साद शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिली आहे. महाविकास आघाडीमार्फत शनिवारी मुंबईतील मोर्चा काढण्यात येणार आहे. तो यशस्वी करण्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे आणि रायगडसह राज्याच्या विविध ठिकाणांहून मोर्चेकरी आणण्याचे नियोजन अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यात झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत गुरुवारी करण्यात आले. हा मोर्चा महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची अखंडता याविषयी असल्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या भावनेशी निगडित आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी या प्रश्नावरही मोर्चाद्वारे सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात येणार असल्याचा संदेश जनतेपर्यंत नेण्याचे यावेळी ठरले. मोर्चास बसगाड्या, खासगी वाहनांशिवाय रेल्वे आणि लोकलने नागरिकांना आणण्याचे नियोजन असल्याचे आघाडीच्या एका नेत्याने सांगितले. या बैठकीस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, आमदार भाई जगताप, नसीम खान, युवा नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, सचिन अहिर, सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, सपचे आमदार रईस शेख, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी, मार्क्सवादी कम्युनिस्टचे मिलिंद रानडे, शेतकरी कामगार पक्षाचे राजू कोरडे आदी उपस्थित होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नावाने मध्यंतरी ज्या ट्विटर खात्यावरून चिथावणीखोर ट्वीट करण्यात आली, ते खाते बनावट होते, हा खुलासा करण्यास इतके दिवस का लागले? आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत गेले आणि 'होयबा' करून आले. -उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी विनाकारण सीमावाद निर्माण केला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या नावाने मुद्दामहून बनावट बातम्या पसरवण्यात आल्याचा दावा आता केला जात आहे. असे असल्यास त्यामागील सूत्रधार कोण, याची चौकशी व्हायला हवी. -अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस नेते


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jsuGV7D

No comments:

Post a Comment