Breaking

Sunday, December 4, 2022

विशाळगडावरील अतिक्रमण काढणार की नाही? संभाजीराजे आक्रमक, प्रसाद लाड यांनाही फटकारलं https://ift.tt/sUQneBT

कोल्हापूर : विशाळगडाला घाणीतून मुक्त करणार आहात की नाही ? तुम्ही करणार नसाल तर मग मला यामध्ये उतरावे लागेल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. आज स्वतः विशाळगडावर जाऊन त्यांनी इथे झालेल्या अतिक्रमण तसेच तिथल्या परिस्थितीबाबत माहिती घेतली. यानंतर ते बोलत होते. पुढच्या काळात आपल्याला यामध्ये लक्ष घालावे लागेल असा सज्जड दम सुद्धा संभाजीराजेंनी दिला. गेल्या अनेक वर्षांपासून विशाळगड संवर्धन तसेच इथला अतिक्रमणाचा मुद्दा समोर आला आहे. त्यामुळे सातत्याने शिवप्रेमींसह हिंदुत्ववादी संघटनांकडून याकडे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. शिवाय भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत ही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. प्रसाद लाड हा मूर्ख माणूस आहे, त्यावर बोलणं म्हणजे मी मूर्ख होणं असून आपण किती मूर्ख आहोत हे प्रसाद लाड यांनी समजून घ्यावे, असे संभाजी राजे म्हणाले आहेत. विशाळगडावरील अतिक्रमण पाहून संभाजीराजे आक्रमक : शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्यानंतर पन्हाळा,पाठोपाठ विशाळगड ही आपल्या ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज,राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांचा इतिहास सांगणाऱ्या विशाळगडावर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे चित्र आहे. शिवाय विशाळगडाला जणू काय जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून गडावर अनेक ठिकाणी कोंबडी कापणे,पार्टी करणे यासारखे प्रकार घडत असल्याने शिवभक्त विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी आज विशाळगडाची पाहणी केली. येथील परिस्थिती पाहत संभाजी राजे छत्रपती यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून जे जे पुढारी,नेते छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करतात त्यांनी एकदा स्वतः विशाळगडावर येऊन गडाची पाहणी करावी.केवळ छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातल्याने कोणी शिवभक्त होत नाही तर त्यांचे जिवंत स्मारक जपणारा खरा शिवभक्त असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कृती आराखडा दिला पाहिजे : संभाजीराजे यांनी जिल्हाधिकारी यांची सुद्धा ही जबाबदारी असल्याचे म्हणत विशाळगडावर इतकी महाभयानक स्थिती निर्माण झालीच कशी? असा सवाल उपस्थित केला. पुरातत्त्व खात्याने अतिक्रमण करण्याची परवानगी कशी दिली. सरकार विशाळगडाकडे लक्ष देणार आहे का नाही हे स्पष्ट कराव, अन्यथा मला यामध्ये उतरावे लागेल, असा सज्जड दमच संभाजीराजांनी सरकारला दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ मिटींगला वेळ देऊन चालणार नाही तर अ‌ॅक्शन प्लॅन दिला पाहिजे. एव्हढेच काय तर सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी येऊन इथे काय परिस्थिती निर्माण झाली आहे हे पाहावे असेही ते म्हणाले.तसेच विशाळगड संदर्भात त्वरित पाऊल उचलावे यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी उद्या बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रसाद लाड मूर्ख माणूस; त्यावर काय बोलणार : प्रसाद लाड यांनी शिवरायांबाबतच्या चुकीचा इतिहास पत्रकार परिषदेत सांगितला याबाबत संभाजीराजे आक्रमक झाले असून प्रसाद लाड हा मूर्ख माणूस आहे. त्याच्यावर आपण काय बोलणार ? मी बोललो तर मी मूर्ख ठरेल असे म्हणत जोरदार टीका केली. शिवाय आपण स्वतःला शिवरायांचा भक्त मानतो आणि शिवरायांचा जन्म कोकणात झाला असे सांगतो तर यासारखे काही दुर्दैव नाही. प्रसाद लाड आपण किती मूर्ख आहेत हे त्यांनी पाहावं असेही संभाजीराजे म्हणाले आहेत.तसेच जिथे जिथे इतिहासाची मोडतोड होते तेथे स्वराज्य संघटना व शिवभक्त समोर येतील हर हर महादेव चे शो आज अगोदर बंद पाडले आता छोट्या पडद्यावर प्रदर्शित करण्याचे प्रयत्न होत असून हे आम्ही होऊ देणार नाही असेही संभाजीराजें म्हणाले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/PIA5zXH

No comments:

Post a Comment