दोहा : लिओनेल मेस्सीला फुटबॉल वर्ल्ड कपच्या विजेतेपदाची आस लागली आहे. त्याच्या या स्वप्नपूर्तीच्या मार्गात आज, शुक्रवारी मध्यरात्री नेदरलँड्सचा अडथळा असेल. लुईस व्हॅन गाल यांच्या मार्गदर्शनाखालील नेदरलँड्स संघ जास्त धोकादायक होत आहे. दिएगो मॅराडोनाच्या निधनानंतरच्या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनास जगज्जेतेपद हवे आहे. हे पूर्ण करण्याची जबाबदारी प्रामुख्याने मेस्सीवर आहे. सात वेळा जगातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या मेस्सीला एकदाच अर्जेंटिनास कोपा अमेरिकेचे विजेतेपद जिंकून देता आले आहे. मेस्सीच्या मार्गात नेदरलँड्सचे मार्गदर्शक लुईस व्हॅन गाल यांचा मुख्य अडथळा आहे. खेळाडू म्हणून हुकलेले जगज्जेतेपद जिंकण्यास ते आतूर आहेत. व्हॅन गाल यांची व्यूहरचना मेस्सीभोवती केंद्रित असेल. मेस्सीला आक्रमणापासून रोखले तर अर्जेंटिना खेळाडूंना गोलक्षेत्रापासून दूर ठेवता येईल हे ते जाणतात. त्यामुळे ते पारंपरिक डच आक्रमकतेस मुरडही घालण्याची योजना आखू शकतात. 'आमची व्यूहरचना तयार आहे. आमचा संघ सरस आहे. मेस्सीला चेंडूपासून दूर ठेवणार आहोत,' असे सांगून व्हॅन गाल यांनी अर्जेंटिनाला डिवचले आहे. मेस्सीलाही नेदरलँड्स किती त्रासदायक आहेत, याची कल्पना आहे. मात्र, चाहत्यांची जोरदार साथ या सामन्यात मोलाची ठरेल, असे त्याने सांगितले. प्रतिस्पर्ध्यातील वर्ल्ड कपमधील गेल्या दोन लढती गोलशून्य बरोबरीत झाले आहेत. नेदरलँड्स गेल्या १९ सामन्यांत अपराजित, तर सौदीविरुद्धच्या पराभवानंतर प्रत्येक सामन्यात अर्जेंटिनाचा खेळ उंचावतोय. लुईस व्हॅन गाल मार्गदर्शक असताना गेल्या अकरा वर्ल्ड कप लढतींत नेदरलँड्स अपराजित राहीली आहे. नेदरलँड्सची वर्ल्ड कपमध्ये बिगर युरोपियन प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध गेल्या २० सामन्यांत एकही हार नाही. अर्जेंटिनाची गेल्या ४० आंतरराष्ट्रीय सामन्यांत एक पराभव पण त्यांनी २८ विजयही मिळवले आहेत. यंदाच्या स्पर्धेतील चारही सामन्यांत अर्जेंटिनाने पहिला गोल केला. अर्जेंटिनाने १९७८ मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकताना नेदरलँड्सला अंतिम फेरीत हरवले होते. वर्ल्ड कपमध्ये मेस्सीचे २३ सामन्यांत नऊ गोल झाले आहेत. नेदरलँड्सचा वर्ल्ड कपमधील गेल्या दोन पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव. यापूर्वी त्यांचा पराभव हा अर्जेंटिनाविरुद्ध झाला होता. अर्जेंटिनाच्या वर्ल्ड कपमधील युरोपियन प्रतिस्पर्ध्यांविरुद्धच्या गेल्या १३ पैकी सात लढतींचा निर्णय निर्धारित वेळेनंतर संपल्या आहेत. अर्जेंटिना सुरुवातीस गोल करण्यात अपयशी ठरल्यास काहीही घडू शकते. कारण नेदरलँड्सचे संयमी पासिंग आणि चांगले मॅन-टू-मॅन मार्किंग अर्जेंटिनाची डोकेदुखी ठरू शकते. प्रतिस्पर्ध्यांचा विचार केल्यास अर्जेंटिनाचे आक्रमण खूपच सरस आहे. कारण लिओनेल मेस्सीची एकहाती सामना जिंकण्याची क्षमता आहे. नेदरलँड्स वि. अर्जेंटिना ठिकाण ःल्युसैल स्टेडियम वेळ ः मध्यरात्री १२.३० फिफा क्रमवारी ः ३ - अर्जेंटिना, ८ - नेदरलँड्स एकमेकांविरुद्ध ः नऊपैकी प्रत्येकी दोन लढतींत प्रतिस्पर्धींचा विजय. वर्ल्ड कपमध्ये ः पाचपैकी प्रत्येकी दोन सामन्यांत प्रतिस्पर्धी विजयी. याशिवाय एक बरोबरी. स्पर्धेतील कामगिरी ः नेदरलँड्सचे तीन विजय आणि एक बरोबरी. अर्जेंटिनाचे तीन विजय आणि एक पराभव.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/MRIAiH2
No comments:
Post a Comment