मुंबई : महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित आणि साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी शुक्रवारी मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मिळालेल्या आश्वासनानंतर राजीनामा मागे घेतला. दीक्षित आणि मोरे यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न झाल्यानंतर राज्यभरातील 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम'च्या अनुवादावरून इतर साहित्यिकांनी दिलेल्या राजीनाम्यांसंदर्भातही चर्चेची अपेक्षा मराठी भाषा विभागाकडून व्यक्त केली जात आहे.पुण्यामध्ये दीक्षित आणि मोरे यांच्याशी केसरकर यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. त्यानंतर हा राजीनामा मागे घेण्यात आला. राजीनामा मागे घेण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलताना दीक्षित यांनी विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने मिळालेल्या वागणुकीचा निषेध जाहीरपणे नोंदवल्याचे सांगितले. यासोबतच वर्षभर ज्या प्रशासकीय अडचणींना तोंड द्यावे लागले, प्रशासकीय आणि आर्थिक कोंडी झाल्याने कामावर झालेल्या परिणामांची माहितीही केसरकर यांना दिली. केसरकरांनी कामामध्ये हस्तक्षेप होणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर हा राजीनामा मागे घेतल्याचे दीक्षित यांनी सांगितले. मोरे यांनीही प्रशासकीय कोंडीमुळे राजीनामा दिला होता. त्यांनीही राजीनामा मागे घेत असल्याचे सांगितले. यानंतर येत्या काळात सध्या उपलब्ध असलेल्या निधीच्या माध्यमातून काम सुरू ठेवण्यात येईल, असेही दीक्षित यांनी सांगितले. आधीच्या सरकारने नेमलेले मंडळ या सरकारने बरखास्त केल्याचे आदेश काढलेले नाहीत. त्यामुळे हा कारभार पुन्हा सुरू होईल, अशीही माहिती दीक्षित यांनी दिली.'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' पुस्तकाच्या अनुवादाला मिळालेला पुरस्कार राज्य सरकारने रद्द केल्यानंतर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य, तसेच भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांनीही राजीनामा दिला आहे. दीक्षित आणि मोरे यांच्याशी घेतलेल्या भेटीसोबतच देशमुख यांच्याशीही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याविषयीही चर्चा होऊन मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने साहित्यिकांची नाराजी दूर होण्याच्या दृष्टीने राज्य सरकार प्रयत्न करेल अशी आशा निर्माण झाली आहे. मात्र, अजून सगळ्या नाराज साहित्यिकांशी चर्चा किंवा भेटीच्या दृष्टीने राज्य सरकारने पुढाकार घेतलेला नाही, असेही स्पष्ट झाले आहे.'सरकारने समन्यायी भूमिका ठेवावी'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार यांनीही दिला होता. पवार यांनी, आपल्याशी अजूनही कुणीही संपर्क साधलेला नाही, असे स्पष्ट केले. राजीनामा देताना पुरस्काराच्या मुद्द्यावर सरकारकडून साहित्यिकांशी चर्चा अपेक्षित असल्याचे आवाहन त्यांनी केले होते. मात्र, त्याची दखल अजूनही घेण्यात आलेली नाही, असे त्या म्हणाल्या. प्रशासकीय वागणुकीपासून सर्वच बाबतीत राज्य सरकारने समन्यायी भूमिका ठेवावी, असे मतही या निमित्ताने राजीनामा दिलेल्या इतर साहित्यिक, भाषा अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/vB5lqSY
No comments:
Post a Comment