Breaking

Sunday, January 22, 2023

नियमांमध्ये बदल का? पाणथळींच्या संरक्षणाबाबत सरकारकडून अपेक्षित भूमिका नाही https://ift.tt/PbVJCNx

मुंबई : राज्यातील पाणथळ क्षेत्रांचे संरक्षण न झाल्यास जैवविविधता धोक्यात येईल त्याचप्रमाणे पूरस्थितीचे प्रमाण वाढेल, भूजलसाठ्यावर परिणाम होईल याची जाणीव असतानाही राज्य सरकार पाणथळींच्या संरक्षणाबाबत अपेक्षित भूमिका घेत नसल्याचे या क्षेत्रातील कार्यकर्ते आणि अभ्यासकांचे मत आहे. ठाणे खाडीला रामसर दर्जा मिळाल्यानंतर केवळ तेवढ्यापुरते संरक्षण मर्यादित न राहता राज्यातील इतर क्षेत्रांसाठी काय उपाययोजना करणार ते समोर येणे अपेक्षित आहे.पाणथळ क्षेत्रांबाबत सन २०१०चा कायदा बदलून सन २०१७ला नवा कायदा आणला. यामध्ये काही पाणथळ जागांचे संरक्षण रद्द झाले. याचा परिणाम उरण परिसरामध्ये दिसून येत आहे. उरणमध्ये पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची वारंवारता वाढते आहे. पवई तलाव पाणथळ क्षेत्र आहे, तसेच विहार तलावही पाणथळ क्षेत्र आहे. असे असूनही पवई तलावात भराव घालण्यात आला. विहार तलावाच्या बाजूने रस्ता बनवला. तलावांमध्ये अतिरिक्त पाणी साचले नाही तर पूरस्थिती निर्माण होणार. मात्र या वास्तवाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने राज्य सरकारला पाणथळ क्षेत्र वाचवण्यामध्ये रस आहे का, असा प्रश्न वनशक्तीचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी उपस्थित केला आहे. मिरा रोडसारख्या ठिकाणी पाणथळीच्या अॅटलासवरून अभ्यासक पाणथळ जागा शोधायला जातात तेव्हा तिथे इमारती उभ्या असलेल्या दिसतात. विकासाच्या नावाखाली या नैसर्गिक परिसंस्था नष्ट करण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात येतात का, असा प्रश्न या निमित्ताने त्यांनी उपस्थित केला आहे. सागरी किनारा क्षेत्रात खाडीला सीआरझेड नियमांनुसार संरक्षण आहे. मात्र याचे संरक्षण होताना दिसत नाही. खाजण, दलदलीच्या जागा घोषित होत नाहीत. राज्य सरकारकडे यासंदर्भातील सुमारे ६६ हजार पाणथळ क्षेत्रांची यादी उपलब्ध आहे. याची प्रत्यक्ष जमिनीवरील पाहणी करण्यासाठी वेळ लागणार असे सांगताना या जागांवरील विकासकामांवर प्रतिबंध येणे अपेक्षित असताना तिथे काम सुरूच राहिलेले दिसते, अशी तक्रार करण्यात येते.ज्या परिसरातील पाणथळ जागांवर भराव घातला जातो, त्या परिसरात झाडे सुकत जाताना दिसतात. पाणथळ क्षेत्र हे भविष्यात पाणी उपलब्ध होण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. या स्रोतांवर परिणाम झाल्याने भूगर्भ जलसाठ्यावरही परिणाम होतो. सन २०१३ला उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पाणथळीचे अॅटलास प्रत्यक्ष जमिनीवरून तपासून त्यांचे संरक्षण करण्याचे आदेश दिले होते. मात्र नऊ वर्षांनंतरही हे काम रखडलेले दिसते, यावर पर्यावरण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ नाराजी व्यक्त करतात.ठाणे खाडीला रामसर दर्जा मिळाला आहे. मात्र या पलीकडे जाऊन महाराष्ट्रात पाणथळ संवर्धनासाठी काम होणे आवश्यक असल्याचे डॉ. रितेश कुमार म्हणाले. मुंबईच्या पूरस्थितीत पाणथळीचे महत्त्व लक्षात येते. या पाणथळ जागा पूर आणि दुष्काळ या दोन्ही परिस्थितीमध्ये संरक्षणाचे कार्य करतात. या पार्श्वभूमीवर पाणथळ संरक्षण उपाययोजना समोर येण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.संवर्धन आवश्यकपाणथळ जागा नष्ट होण्याचे परिणाम केवळ तेवढ्याच क्षेत्रापुरते मर्यादित राहात नाहीत, तर एखाद्या साखळीप्रमाणे हे दुष्परिणाम घडत जातात. त्यामुळे पाणथळीचे संवर्धन आवश्यक असल्याचे वेटलँड इंटरनॅशनलचे अध्यक्ष डॉ. रितेश कुमार यांनी स्पष्ट केले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/amlf56k

No comments:

Post a Comment