नवी दिल्ली : 'कसोटी मालिकेपूर्वी भारतात सराव सामने खेळणे निष्फळ आहे. त्यापेक्षा आम्ही आमचा सराव केलेला कधीही चांगले,' असे मत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने व्यक्त केले. ऑस्ट्रेलिया संघ चार कसोटी आणि तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला आहे. मात्र, यापूर्वी कुठलाही सराव सामना भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान होणार नाही. पहिली कसोटी नऊ फेब्रुवारीपासून नागपूरात खेळली जाईल.भारतीय संघ सराव सामन्यासाठी हिरव्यागार खेळपट्ट्या तयार करायचा आणि कसोटी मालिकेसाठी फिरकीला अनुकूल. त्यामुळे या सराव सामन्याचा फारसा उपयोग होत नाही, असे स्मिथला वाटते. त्यामुळे सध्या ऑस्ट्रेलियाच्या १८ सदस्यीय संघाचा सराव सुरू आहे. पण यापूर्वी सिडनी येथे भारतात असतात, तशा वेगवेगळ्या खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या होत्या. स्मिथ म्हणाला, 'इंग्लंडमध्ये आम्ही साधारण दोन सराव सामने खेळतो. या वेळी मात्र आम्ही भारत दौऱ्यावर सराव सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वेळी आम्ही भारत दौऱ्यावर गेलो होतो, तेव्हा सराव सामन्यात हिरव्यागार खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्ष सामन्या वेळी फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या असतात. त्यामुळे अशा सराव सामन्यांना काही अर्थ नसतो. त्यापेक्षा आम्ही नेट सरावावर भर देणार आहोत.'ऑस्ट्रेलिया संघ भारतात अखेरची कसोटी मालिका २००४मध्ये जिंकला आहे. त्यानंतरच्या चारही कसोटी मालिका भारताने जिंकल्या आहेत. २०१७मध्ये भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान भारतात शेवटची कसोटी मालिका झाली. त्यात भारताने २-१ने बाजी मारली होती. स्मिथ म्हणाला, 'थांबा आणि पाहा हेच धोरण आम्हाला खेळपट्ट्यांबाबत स्वीकारावे लागणार आहे. त्यामुळे कसोटी मालिकेपूर्वी सराव सामना न खेळण्याचा आमचा निर्णय योग्यच आहे.' भारतातील कसोटी मालिका नेहमीच महत्त्वाची असते. मलाही भारतात कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. मी कसोटी मालिकेसाठी दोन वेळा भारत दौऱ्यावर गेलो. कसोटीत तेथे खेळणे सोपे नाही. त्यामुळे काही आव्हानांचा आम्हाला नक्कीच सामना करावा लागणार आहे, असेही स्मिथने सांगितले. भारतामधील सराव सामन्यांमध्ये काही प्रमाणात आमची फसवणूक होते, हे आमच्या ध्यानात आल्याचे स्मिथला म्हणायचे आहे. कारण सराव करताना एक आणि प्रत्यक्ष कसोटी सामना सुरु झाल्यावर वेगळीच खेळपट्टी पाहायला मिळते, असे स्मिथला म्हणायचे आहे. स्मिथने भारतात सहा कसोटींत ६०च्या सरासरीने ६६० धावा केल्या आहेत. यात तीन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/yElFxjb
No comments:
Post a Comment