म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील सुमारे १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी आरोग्यसेवा कोलमडली आहे. परिणामी आरोग्य विभागाने रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आता नव्या पर्यायाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक स्तरांवर दैनंदिन तत्त्वावर (रोजंदारी पद्धत) मनुष्यबळ नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.आरोग्यसेवा आयुक्त धीरज कुमार यांनी राज्यातील सर्व उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्राद्वारे या संदर्भात सूचना केल्या आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यातील विविध सरकारी कर्मचारी संघटनांनी १४ मार्चपासून संप पुकारला आहे. या संपात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत काही कर्मचारीही सहभागी झालेले आहेत. त्याचा फटका राज्यातील रुग्णसेवेला बसत आहे. याची गंभीर दखल राज्याच्या आरोग्य विभागातर्फे घेण्यात आली आहे. या संदर्भात शुक्रवारी एक बैठक पार पडल्यानंतर आवश्यक त्या उपायोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार यांनी दिल्या आहेत.‘संपाच्या काळात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यावश्यक असणारी आरोग्यसेवा सुरू राहावी यासाठी क्षेत्रीय यंत्रणांशी योग्य तो समन्वय साधावा. विशेषतः अत्यावश्यक सेवा, अतिदक्षता विभाग, लेबर रूम या संवेदनशील विभागांची सेवा अविरत सुरू राहील याबाबत दक्षता घ्यावी. सार्वजनिक आरोग्य संस्थांमधील रुग्णसेवा बाधित होणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात,’ अशा सूचना कुमार यांनी पत्रात केल्या आहेत.अन्य निर्देश- रुग्णसेवेत बाधा येऊ नये यासाठी अपघात विभाग, आपत्कालीन कक्ष, रुग्णवाहिका सुसज्ज ठेवण्यात याव्यात.- क्षेत्रीय स्तरावर राष्ट्रीय आरोग्य अभियान व इतर कार्यक्रमांतर्गत उपलब्ध कंत्राटी मनुष्यबळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवांसाठी नियुक्त करावे.- जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक स्तरावर आवश्यतेनुसार दैनंदिन तत्त्वावर मनुष्यबळ नियुक्त करण्यात यावे.- दैनंदिन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांची नेमणूक सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटेपर्यंत किंवा ३१ मार्चपर्यंत जे अगोदर होईल तोपर्यंतच राहणार आहे. त्यानंतर दैनंदिन तत्त्वावर नेमेलेले मनुष्यबळ कार्यरत ठेवायचे असल्यास त्याबाबत स्वतंत्र सूचना आरोग्य विभागामार्फत दिल्या जाणार आहेत.- सरकारी व खासगी नर्सिंग महाविद्यायालये, वैद्यकीय महाविद्यालये, औषधनिर्माता महाविद्यालये यांच्याशी समन्वय साधून त्यांच्यामार्फत आवश्यकतेनुसार कर्मचारी उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही करावी; तसेच संपकाळात या महाविद्यालयांमार्फत उपलब्ध प्रशिक्षणार्थीच्या नेमणुका रुग्णालयांमध्ये कराव्यात.- रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रत्येक रुग्णालयात समन्वयकाची नेमणूक करण्यात करण्यात येणार आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कार्यरत आरोग्य मित्र यांच्या नेमणुकाही करता येईल.- संपाच्या माहितीसाठी राज्यस्तर, उपसंचालक आरोग्यसेवा परिमंडळे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याबाबत सूचना.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/us2Ww3P
No comments:
Post a Comment