Breaking

Tuesday, April 11, 2023

आंदोलनातील तोडफोड भोवली, माजी आमदारासह १९ जणांना पाच वर्षांच्या शिक्षेसह दंड, नांदेड कोर्टाच्या निर्णयानं खळबळ https://ift.tt/f4wBRDa

अर्जुन राठोड,नांदेड : आंदोलनावेळी वाहनांची तोडफोड करणे तत्कालीन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना चांगलंच अंगलट आलं आहे. वाहनांची तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी महिला आमदार आणि जिल्हा प्रमुखासह १९ जणांना नांदेड न्यायालयाने तब्बल पाच वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी एक लाख साठ हजार ७६० रुपयांचा दंड ठोठावला आहे. नांदेडचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. ई. बांगर यांनी मंगळवारी ही शिक्षा सुनावली आहे.७ जून २००८ रोजी आमदार असलेल्या अनुसया खेडकर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली गेट परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात तत्कालीन जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे, भुजंग पाटील यांच्या अनेक आजी माजी पदाधिकारी सहभागी झाले होते. या दरम्यान महापालिका आणि पोलिसांच्या दोन वाहना सह चार एसटी बसेस वर दगडफेक देखील करण्यात आली. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच दोन पोलीस अधिकारी जखमी झाले होते. या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी १९ जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तब्बल पंधरा वर्ष नांदेडच्या न्यायालयात प्रकरण सुरु होतं. अखेर पंधरा वर्षानंतर न्यायाधीश बांगर यांनी माजी आमदारासह १९ जणांना पाच वर्ष कारावास आणि एक लाख साठ हजार ७६० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर एकच खळबळ उडाली आहे. नांदेडच्या इतिहासात हा पहिला निर्णय असल्याचे बोललं जातं आहे. दरम्यान दंडाची रक्कम महापालिका, पोलीस विभाग आणि जखमी अधिकाऱ्यांना देण्याचे आदेश न्यायालयाने यावेळी दिले आहे.

शिक्षा कुणाला सुनावली?

माजी आमदार अनुसयाबाई खेडकर, महेश खेडकर, जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे, सह संपर्क प्रमुख भुजंग पाटील, नरहरी वाघ, बालाजी शिंदे, नवनाथ भारती, माजी पंचायत समिती सभापती व्यंकोबा रोगडे, भुजंग कावळे, बालगीर गिरी, दौलत पोकळे, बाळू तिडके, शिवाजी सूर्यवंशी, श्रीकांत पाठक, सुभाष शिंदे, भैया शर्मा यांच्या सह ठाकरे गटातून भाजपात गेलेले दिलीप ठाकूर, संदीप छपरवार, मनोज यादव यांना शिक्षा सुनावली आहे.

गोळीबार प्रकरणात सुटले अन तोडफोड प्रकरणात अडकले

दगडफेकीच्या घटने दरम्यान एकाने गोळीबार देखील केला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र, पुराव्या अभावी या सर्व पदाधिकाऱ्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. पण, या दगडफेक प्रकरणात सर्व जण अडकले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाने एकच खळबळ उडाली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/KE0ra6j

No comments:

Post a Comment