जालना : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील बाजार समितीच्या यार्डात कापूस व भुसार माल खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याचा जायकवाडीच्या डाव्या कालव्यात कार कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. नंदू सोनाजी राजगुरू (वय ३८) असं या व्यापाऱ्याचे नाव असून ते अंबड तालुक्यातील रुई या त्यांच्या गावाहून दुपारी भार्डी मार्गे तीर्थपुरीकडे जात होते.मिळालेल्या माहितीनुसार, नंदू राजगुरू यांची कार भार्डी गावाजवळील जायकवाडीच्या डाव्या कालव्यात अचानक कोसळली. कालव्यात असलेल्या पाण्यात बुडून राजगुरू यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कारमध्ये ते एकटेच असल्याची माहिती आहे. कार कालव्यात कोसळताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मोठ्या प्रयत्नाने गाडी बाहेर काढली. मात्र तोपर्यंत राजगुरू यांची प्राणज्योत मालवली होती.आडत व्यापारी नंदू राजगुरू यांच्या आडत दुकानात तीर्थपुरी व परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेकडो क्विंटल सोयाबीन आगाऊ जमा करून ठेवले असल्याचेही कळते. तसंच राजगुरू यांच्याकडे अनेकांचे हातऊसने व व्याजाचे लाखो रुपये देणे असल्याची चर्चा असून नंदू राजगुरू यांचा कालव्यात बुडून मृत्यूच्या घटनेने त्या देणेकऱ्यांची व सोयाबीन ठेवलेल्या शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग जमा झाले आहेत.दरम्यान, तीर्थपुरी पोलीस ठाणे येथे नंदू राजगुरू यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसंच राजगुरू हे व्यापारी असल्याने पोलीस विविध बाजूने या दुर्घटनेचा तपास करीत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/fjpwhSD
No comments:
Post a Comment