Breaking

Saturday, April 8, 2023

मुंबईत बेस्ट बस अपघातात 'या' कारणामुळे लोकांनी गमावले जीव; ८ वर्षांत १३४ अपघात https://ift.tt/r190Rjs

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांच्या अपघातांत बाइकस्वार, पादचाऱ्यांबरोबरच प्रवाशांनाही प्राण गमवावे लागत आहेत. गेल्या आठ वर्षांत बेस्ट बसचे १३४ प्राणांतिक अपघात झाले असून १३७ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. सन २०१५-१६च्या तुलनेत २०२२-२३मध्ये अपघात, मृत्यू आणि जखमींमध्ये घट झाली आहे.मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये विविध कारणांनी शेकडो प्रवाशांना प्राण गमवावे लागतात, तर काही जखमींना कायमचे अपंगत्व येते. अशीच काहीशी परिस्थती बेस्ट उपक्रमातही आहे. बेस्ट ही मुंबईबरोबरच महानगर क्षेत्रातील काही भागांपर्यंत धावते. त्यामुळे बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या दररोजच्या प्रवाशांची संख्या ३५ लाखांपार गेली आहे. या प्रवाशांसाठी बेस्टकडून विविध बस प्रकारांबरोबरच बसची संख्याही वाढवण्यावर भर दिला जात आहे. विविध योजना आणणाऱ्या बेस्टला मात्र अपघातांनीही घेरले आहे. चालकाकडून बेस्ट बस वेगाने चालविणे, ओव्हरटेक करणे यामुळे अपघातांना सामोरे जावे लागते. यात अन्य वाहन चालक, प्रवासी किंवा पादचाऱ्यांचाही अपघात होतो. उपक्रमाने दिलेल्या माहितीनुसार, २०१५-१६ ते २०२२-२३ या आठ वर्षांत एकूण १३४ प्राणांतिक अपघातात १३७ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१५-१६मध्ये २९ प्राणांतिक अपघातांमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सर्वाधिक प्राणांतिक अपघात २०१८-१९मध्ये झाले. २३ अपघातांत २३ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर अपघातात घट होऊ लागली. २०२१-२२मध्ये नऊ अपघातांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला, तर २०२२-२३मध्ये आठ अपघातांत आठ जणांचा मृत्यू झाल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले. मृतांपेक्षा जखमींची संख्या जास्त असली तरीही आठ वर्षांत या संख्येतही घट झाली आहे. आठ वर्षांत १ हजार ४०५ अपघातांमध्ये १ हजार ६८ जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. २०१५-१६मध्ये ४६५ अपघातांत ३५५ जण जखमी झाले. गेल्या आर्थिक वर्षात ६१ अपघातांत ५४ जण जखमी झाल्याची नोंद आहे. शून्य अपघातासाठी प्रयत्नबेस्ट बसच्या अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी उपक्रमाकडून चालकांना प्रशिक्षण व जनजागृती, तसेच त्यांचे समुपदेशन करण्याचे काम केले जाते. यातून त्यांचा ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न असतो. चालकांकडून शून्य अपघातांची नोंद व्हावी, यासाठी अशा चालकाचा वर्षातून एकदा सत्कारही केला जातो. जेणेकरून त्यांची कामगिरी आणखी सुधारण्यास मदत होते. बेस्ट बसचे अनेक अपघात हे दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक आणि पादचाऱ्यांनी खबरदारी न घेतल्यानेही होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ualpIK3

No comments:

Post a Comment