म. टा. प्रतिनिधी, पुणे : केरळमध्ये नैऋत्य मान्सून दाखल झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरुवारी जाहीर केले. केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख १ जून आहे. यंदा मान्सून आठवडाभर उशिराने केरळमध्ये दाखल झाला असून, महाराष्ट्रातही त्याचे आगमन सर्वसाधारण तारखेपेक्षा उशिराच होणार असल्याचे स्पष्ट आहे. केरळच्या बहुतांश क्षेत्रासह दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे, मध्य अरबी समुद्राचा काही भाग; तसेच तमिळनाडूचाही काही भाग मान्सूनने गुरुवारी व्यापला. पुढील ४८ तासांत मान्सून आणखी प्रगती करणार असल्याचे 'आयएमडी'ने अंदाजात म्हटले आहे.मध्य पूर्व अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ सक्रिय असूनही, दोन दिवसांत आग्नेय अरबी समुद्र आणि केरळच्या बहुतांश क्षेत्रामध्ये मान्सून आगमनासाठी आवश्यक हवामानाची स्थिती तयार झाली. 'केरळच्या बहुतांश भागांत पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहाला जोर आला असून, वाऱ्यांनी अपेक्षित उंचीही गाठली. केरळ आणि लक्षद्वीपच्या बहुतांश भागांत २४ तासांत सर्वदूर पावसाची नोंद झाली. या संपूर्ण भागाला ढगांनी व्यापले आहे. या स्थितीमुळे मान्सून आगमनाचे सर्व निकष पूर्ण होत असून, केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचे स्पष्ट होते', असे 'आयएमडी'ने म्हटले आहे. कर्नाटकात धडकणारमान्सून प्रगतीची उत्तर सीमा सध्या कन्नूर, कोडाईकॅनॉल, आदिरामपट्टीनम येथून जात आहे. बंगालच्या उपसागराच्या बाजूनेही मान्सूनची प्रगती झाली असून, गुरुवारी मान्सूनने मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागरात प्रगती केली. मान्सूनची वाटचाल अशीच सुरू राहणार असून, पुढील २४ तासांत मान्सून केरळचा उर्वरित भाग, कर्नाटक आणि तमिळनाडूचा काही भाग; तसेच ईशान्येकडील काही राज्यांत दाखल होऊ शकतो, अशी शक्यता 'आयएमडी'ने वर्तवली आहे. चक्रीवादळानंतर राज्यात आगमन?पुढील दोन दिवसांत केरळच्या पुढे मान्सूनची कर्नाटकपर्यंत वाटचाल अपेक्षित असली, तरी किनारपट्टी सोडून महाराष्ट्राच्या इतर भागांत मान्सून दाखल होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागू शकते, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ सक्रिय असून, चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर राज्यावर मोसमी वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय होऊ शकेल, असे विविध मॉडेलमधून दिसत आहे. मान्सूनचे आगमन आणि सरासरीमान्सूनच्या केरळमधील आगमनाच्या तारखा सर्वसाधारणपणे १ जूनपासून आठवडाभर मागे-पुढे होत असतात, असे आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या दोन दशकांत या आधी २०१९, २०१६ आणि २००३मध्ये मान्सून ८ जूनला म्हणजे सर्वांत उशिरा केरळमध्ये दाखल झाला होता. तर, २००१ आणि २००९मध्ये तो सर्वांत लवकर २३ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. आगमनाच्या तारखा आणि हंगामी पाऊस यांचा परस्परसंबंध नसल्याचे आकडेवारी सांगते. मात्र, दोन दशकांमध्ये मान्सून सर्वांत उशिरा केरळमध्ये दाखल झाला, तेव्हा चांगला पाऊस, तर सर्वांत लवकर दाखल झाला तेव्हा देशात कमी पाऊस झाल्याचे दिसून येते.दशकभरातील केरळमधील मान्सूनप्रवेशवर्ष तारीख२०१३ १ जून२०१४ ६ जून२०१५ ५ जून२०१६ ८ जून२०१७ ३० मे२०१८ २९ मे२०१९ ८ जून२०२० १ जून२०२१ ३ जून२०२२ २९ मे२०२३ ८ जून
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/qnhuB0Y
No comments:
Post a Comment