नाशिक: भरधाव बुलेटच्या धडकेत सहा वर्षीय बालक ठार झाल्याची घटना नाशिकच्या म्हसरूळ परिसरात असलेल्या ओमकारनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, बुलेटस्वाराला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. अर्णव रोशन भावड (रा. सुप्रभा बंगलो, ओमकारनगर) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. अर्णव हा शनिवारी (१० जून) सकाळी आपल्या बंगल्यासमोरील रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला. ओमकारनगरकडून पेठ रोडच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या बुलेट क्रमांक (एमएच १५ डीडब्ल्यू ८८००) दुचाकीने त्यास जोरदार धडक दिली. चालकाचा बुलेटवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या धडकेत अर्णवच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. म्हणून त्याला चुलते राकेश भाबड यांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू उपचारांसाठी विलंब झाल्याने डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. तसेच, या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक माळी करत आहेत.दरम्यान, यावेळी बुलेट दुचाकीचालकाविरोधात कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मृत अर्णवच्या नातेवाईकांनी केली. तसेच, जोपर्यंत संबंधित बुलेट दुचाकीचालकाविरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा संतप्त नातेवाईकांनी घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी बुलेट चालकास ताब्यात घेतले. सहा वर्षीय अर्णवच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून भाबड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/OzKFRr9
No comments:
Post a Comment