Breaking

Sunday, July 16, 2023

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून, पहिल्याच दिवशी होणार हायहोल्टेज राजकीय घडामोडी! https://ift.tt/QtNkrxX

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : सत्तेतील सहभागावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज, सोमवारपासून मुंबईत सुरू होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यांनी कामाला सुरुवात केल्यानंतर महाविकास आघाडीची बाजू काहिशी कमकुवत झाली असून, सत्ताधारी तीन गटांचा अधिवेशनावर वरचष्मा राहील, असे दिसते. अशातच काँग्रेसने उभय सभागृहातील विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितल्यामुळे सत्ताधारी तीनही पक्षात समाधानाचे वातावरण आहे.विधानसभेतील पक्षनिहाय आमदारांची आसनव्यवस्था कशी राहील, याचा निर्णय विधानसभा सभागृह सुरू झाल्यानंतर होईल. परिणामी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची आमदार संख्या यातून स्पष्ट होईल. शिवाय अधिवेशनाचा पहिला दिवस विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याचे पद रिक्त असल्यामुळे त्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.विधानसभेतील विरोधी पक्षनेते हे महत्त्वाचे पद अजित पवार यांच्या बंडामुळे काँग्रेसचे ताब्यात जाण्याची शक्यता आहे. हे जवळपास राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने मान्य केले आहे. तथापि, शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यातील विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दावा केल्यामुळे महाविकास आघाडीतील तीन पक्षाचे ऐक्य अबाधित कसे राहणार, हा प्रश्न महाविकास आघाडीतील नेत्यांना पडला आहे.विधान परिषदेत सभापती निवडीसाठी सत्ताधाऱ्यात रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने विधानपरिषदेच्या सभापतिपदासाठी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरल्याचे समजते. मात्र, विधानपरिषदेतील पक्षीय बलाबल पाहता भाजपला हे पद हवे आहे. यामुळे त्यासंदर्भातील निर्णय राज्यपालांकडून होणाऱ्या १२ सदस्यांच्या नियुक्तीनंतर होतो की आधी, याकडे विधानपरिषदेतील आमदारांचे लक्ष लागले आहे. हा सारा प्रकार लक्षात घेता हे अधिवेशन सत्ताधाऱ्यांना सुकर जाईल, असे भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला वाटते.सरकारी पक्षाला विरोधकांच्या माध्यमातून प्रश्न विचारणारी माजी विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील अशी संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेली आमदारमंडळी आता सत्तेसोबत आहेत. यामुळे काँग्रेसचे काही बुजुर्ग आमदार एकहाती किल्ला कसा लढवितात याबाबतची उत्सुकता आहे. राजकीय समीकरणे बदलल्यामुळे सामान्य जनता, शेतकरी, महागाई, महिलांचे प्रश्न मार्गी लागतील, याची शाश्वती कितपत आहे हासुद्धा प्रश्न आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/YON6QrI

No comments:

Post a Comment