म. टा. वृत्तसेवा, उरण/अलिबाग : चित्रपटसृष्टीतील नावाजलेले कलादिग्दर्शक (५७) यांनी कर्जतमधील चौक येथील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सफाई कामगार स्टुडिओत गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी खालापूर पोलिस ठाण्यात अपघातील मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मुंबई आणि रायगड येथील फॉरेन्सिक पथकांमार्फत तपास करण्यात येत आहे.काही दशकांपासून कला क्षेत्रात काम करणाऱ्या देसाई यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत उत्तुंग काम केले. त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजण्याच्या सुमारास नितीन देसाई स्टुडिओमध्ये आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी स्टुडिओमधील मेगा फ्लोअरच्या रंगमंचावर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नितीन देसाई यांची पत्नी, मुलगी यांच्यासमवेत चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हेदेखील दुपारच्या सुमारास एनडी स्टुडिओमध्ये आले होते. बुधवारी सकाळच्या सुमारास नितीन देसाई यांचा फोन लागत नसल्याने त्यांचा शोध घेतला असता, त्यांनी स्टुडिओमधील रंगमंचावर गळफास घेतल्याचे आढळले. या घटनेची माहिती तत्काळ खालापूर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच मुंबईतील कलिना येथील फॉरेन्सिक पथक, रायगड आणि नवी मुंबई येथील फिंगरप्रिंट तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. तब्बल नऊ तास चाललेल्या तपासकार्यानंतर खालापूर पोलिसांनी देसाई यांचा मृतदेह रात्री ८.३०च्या सुमारास शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात आणल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.थकीत कर्जाची चर्चासहा ऑगस्ट १९६५ रोजी ठाण्यात जन्मलेल्या नितीन देसाई यांचे बालपण मुंबईत आणि कोकणात गेले. देसाई यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर यामागे नेमके कारण काय असावे, याची उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी २००५मध्ये कर्जतमधील चौक येथे ४३ एकर जागेवर स्टुडिओ उभारण्यासाठी १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. व्याजासह थकीत कर्जाची रक्कम २५२ कोटी रुपये असल्याचेही स्पष्ट झाले आहे. हे कर्ज न फेडल्यामुळे त्यांच्या कंपनीवर दिवाळखोरीची प्रक्रिया गेल्या आठवड्यात सुरू झाली होती. म्हणजे, त्यांच्या कंपनीविरोधात दाखल झालेली दिवाळखोरीची याचिका दिवाळखोरी न्यायालयाने मंजूर केली होती.मोबाइलमध्ये ऑडिओ क्लिप?नितीन देसाई यांचा मोबाइल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये एक ऑडिओ क्लिप मिळाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामध्ये चार व्यक्तींची नावे समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, बॉलीवूडमधील प्रतिष्ठित कलाकारांशी काही वाद झाल्याने काही वर्षांपासून एनडी स्टुडिओमधील चित्रीकरण ठप्प झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/X3M72ps
No comments:
Post a Comment