म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गासाठी आतापर्यंत जिल्ह्यात १८ टक्के भूसंपादन झाले आहे. उर्वरित शेतकरीही जमिनी देण्यास तयार आहेत. यापूर्वी अनेकदा या रेल्वे मार्गाची अलाइनमेंट बदलण्यात आली असून, आता पुन्हा एकदा काही ठिकाणी अलाइनमेंट बदलण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. तूर्तास ‘महारेल’च हा प्रकल्प पुढे घेऊन जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मंगळवारी दिली.महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यावर पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे काम एकाएकी थांबले. हा प्रकल्प होणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ब्रेक लागल्याची चर्चाही सुरू झाली. परंतु, बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर अजित पवारदेखील उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेतला असून, मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे याबाबतचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी जलज शर्मा, महारेल तसेच रेल्वेचे अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. नाशिक तालुक्यातील पाच आणि सिन्नर तालुक्यातील १७ अशा एकूण २२ गावांमधून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. नाशिक तालुक्यातील जमिनींचे दर निश्चित झाले असले तरी ते प्रशासनाने अद्याप जाहीर केलेले नाहीत. परंतु, सिन्नर तालुक्यातील काही गावांमधील जमिनींचे संपादनही सुरू झाले आहे. प्रकल्पासाठी सरकारी, खासगी आणि वन विभागाच्या जमिनी संपादित करावयाच्या असून, आतापर्यंत १८ टक्के जमिनींचे संपादन झाल्याची माहिती शर्मा यांनी दिली. उर्वरित जमिनी संपादित करण्याची जिल्हा प्रशासनाची तयारी असून, संबंधित शेतकरीही जमिनी देण्यास तयार असल्याचा दावा शर्मा यांनी माध्यमांकडे केला आहे. या प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्रालयाच्या स्तरावर समिती नियुक्त करण्यात येणार असून, त्यामध्ये पवार यांचाही समावेश असणार आहे. पुणे-नाशिक लोहमार्गाची अलाइनमेंट बदलण्याची शक्यता असल्याचे शर्मा यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी निधीचा विषय तूर्तास चर्चेला आला नसल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.दृष्टिक्षेपात प्रकल्पाची सद्य:स्थिती- जिल्ह्यातील २२ गावांमधून जाणार रेल्वेमार्ग- हा रेल्वेमार्ग २३२ किमीचा- जिरायत, हंगामी बागायत आणि बारमाही बागायत जमिनीसाठी प्रतिहेक्टरी दर जाहीर- ४४५ गटांशी संबंधित १२५ खरेदी खते नोंदविली गेली- सिन्नर तालुक्यात ४५ हेक्टर क्षेत्राची थेट खरेदी- सिन्नर तालुक्यात १९७ पैकी १५२ हेक्टर जमिनीचे संपादन होणे बाकी- १२५ भूधारकांना ५७ कोटी २६ लाख ९६ हजार मोबदला वितरीत- नाशिक तालुक्यात पाच गावांमधून ४५ हेक्टर क्षेत्र संपादित करणार- नाशिक तालुक्यातील गावांमधील जमिनींचे दर जाहीर होणे बाकी- तालुक्यातील चार गावांमधील संयुक्त मोजणीची प्रक्रिया पूर्ण
- थेट जलवाहिनीस मुहूर्त
- विवाहेच्छुक तरुणांना फसविणारी टोळी जेरबंद
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/MdAFZzm
No comments:
Post a Comment