म. टा. प्रतिनिधी, नागपूर : तीस लाखांच्या महानगराची काळजी घेणारे प्रशासन नेहमीच अलर्ट मोडवर राहायला हवे. वर्ष सहा महिन्यांच्या कालावधीनंतर एखाद्यावेळी शहरावर संकट येते आणि त्यातूनच प्रशासनाची पकड लक्षात येते. मध्यरात्री बरसलेल्या मुसळधार पावसाने नागपूरकरांना चांगलेच खिंडीत पकडले. नेत्यांकडे दूरदृष्टी आहे, त्यांनी उपराजधानीत सरकारी योजनांचा निधीही ओतला आहे. जिवाच्या आकांताने पाऊस कोसळतो तेव्हा सामान्यांनी जीव मुठीत घेऊन वावरायचे काय? असा संतप्त सवाल नागपूरकरांनी विचारला.‘शहराला दिशा देणारे नेते असून चालत नाही तर काळजी घेणारी सरकारी यंत्रणाही हवी असते. पावसापासून आम्ही बचाव करून घेऊ. मात्र, लोक बुडत असताना मोबाइलवर व्यस्त असणाऱ्या अधिकाऱ्यांपासून आमची सोडवणूक करा’, असा आवाज दिवसभर घुमला. पाच-सात तास गेल्यावर तुंबलेले पाणी तसेही ओसरते, मग नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांचे काय काम? असा रोष अधिकाऱ्यांना चौकाचौकांत सोसावा लागला. झोपडपट्टी भागात हा संताप अधिक होता. प्रशासकीय अधिकारी वर्गांनी ‘सक्काळी सक्काळी’ केलेल्या पाहणी दौऱ्यावरही नेटिझन्स चांगलेच बरसले. रात्री उशिरापर्यंत प्रतिक्रियांचे हे तुफान सुरू होते.सोशल मीडियावर ‘तुफान’उपराजधानीत सुशोभीकरण आणि नव्या कामांचा उपराजधानीतील खर्च ७० हजार कोटींवर पोहचला आहे. नदीनाल्यांची स्वच्छता आणि कचरा सफाईसाठी वेगळा निधी राखून ठेवला आहे. महापालिकेत लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्याने सामान्यांची अडचण होते आहे. मात्र, आपत्ती निवारणासाठी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्तांच्या नक्की किती बैठका झाल्या, असा प्रश्न नागपूरकरांनी सोशल मीडियावर उपस्थित केला. सिमेंट रस्त्यांची आणि पुलांची ओळख सांगत नागपूरकरांनी जगात ताठ मानेने फिरायचे आणि एका वादळी पावसात बोटी चालणाऱ्या चौकांमधून वाट काढायची, हे कुठवर चालणार, असा सर्वसामान्यांचा घणाघात दिवसभर सुरू होता.बहुमजली इमारतींच्या छातीत धस्स …म. टा. प्रतिनिधी, नागपूरवादळी पावसाने झोपडपट्टीत हाहाकार माजविला. बहुमजली इमारतींमधून राहणाऱ्या नागपूरकरांच्याही छातीतही धस्स केले. मध्यरात्री दोन-अडीचनंतर विजांच्या गडगडाटाने पाचव्या मजल्यांच्या वर राहणाऱ्या नागपूरकरांची झोप उडवली. अनेकांनी परस्परांना फोन करून तेव्हाच परिस्थितीचा कानोसा घेणे सुरू केले. ही ढगफुटी असल्याचे मेसेजेस लोकांनी मध्यरात्रीच एकमेकांना पाठविले.विमानतळ परिसर आणि मनीषनगर भागातील नागरिकांना मध्यरात्री अचानक मोठ्ठा आवाज आला. विजांचा गडगडाट इतका तीव्र होता की अनेकांना एखादी विमान दुर्घटना तर झाली नाही ना, असे वाटले. त्यानंतर फोन वाढले. सकाळी टीव्हीवरील बातम्यांमुळे नागपूरच्या भीषण समस्येची तीव्रता त्यांना कळाली. अनेक चित्रफिती व्हायरल झाल्याने देश-विदेशांतून नागपूरकरांवर काळजीचा पाऊस पडला. ‘तुम्ही सुरक्षित असालच’, असे संदेश वाचतच शहरवासीयांनी पाण्यातून वाट काढणे सुरू केले. तोपर्यंत शहरातील शाळांना सुटी जाहीर झाली होती. आकस्मिक स्थितीत कुणाला फोन करायचा, याविषयीचे फोन नंबर त्यानंतर जाहीर झाले. कार्यालयात जाण्यासाठी खाली उतरलेल्या बहुमजली इमारतीतील रहिवाशांना आपल्या गाड्या अर्ध्या पाण्यात बुडाल्याचा साक्षात्कार झाला. ऑफिसला सुटी कळवून लोकांनी मेकॅनिकचा शोध सुरू केला. थोडक्यात, शुक्रवारच्या रात्रीने बहुमजली इमारतींमधील धास्तावलेपण पुढे आणले.सलाम महावितरण...थोडाही पाऊस आला तरी बत्ती गुल होण्याची सवय नागरिकांनी अंगवळणी पाडली आहे. शुक्रवारी मध्यरात्री अक्षरश: आभाळ फाटले असतानाही तुरळक अपवाद वगळता दिवे जाण्याची समस्या कुठेच उद्भवली नाही. संपूर्ण नागपुरातील लाइट्स ऑन होते. जोराच्या वादळातही वीज कायम राखल्याबद्दल नागरिकांनी विद्युत विभागाला मनोमन धन्यवाद दिले. आमचा उद्रेक समजून घ्या, अशी विनंतीही अनेकांनी अधिकारी वर्गाला केली आणि त्यांच्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lOdKpoA
No comments:
Post a Comment